चिपळूण – चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे झालेल्या महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आला असून पोलिसांनी काही तासातच आरोपीला जेरबंद केले.
बेवडा म्हणाली याच रागातून सुनीता पवार यांचा खुन केल्याची कबुली या हत्याकांडातील आरोपीने पोलिसांना दिली. स्वप्नील खातू असे या आरोपीचे नाव असुन तो नांदगाव येथे पवार यांचा शेजारी आहे.
चिपळूण तालुक्यातील नांदगाव खुर्द गोसावीवाडी येथील सुनीता परशुराम पवार या ६५ वर्षीय महिलेला डोक्यात गॅस सिलेंडरची टाकी घालून ठार मारण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. मात्र मयतचे पती परशुराम पवार हे दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी आले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पत्नीचा मृतदेह आढळला आणि ही घटना उघडकीस आली. परशुराम पवार यांनी तात्काळ सावर्डे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आणि पोलिसांनी वेळ न घालवता पुढील कार्यवाहिला सुरुवात केली. प्रत्यक्षात महिलेचा खून झाला त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे स्थानिक गुन्हे विभाग तसेच पोलिसांनी वस्तुस्थितीजन्य पुरावे गोळा करत तपासला सुरुवात केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देत सखोल पाहणी केली आणि पुढील तपासाबाबत पोलीस पथकाला योग्य ते मार्गदर्शन देखील केले होते. तसेच रत्नागिरी येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने तसेच स्थानिक गुन्हे विभाग आणि सावर्डे पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करत तपास सुरू केला. परिसरात व आजूबाजूला देखील त्यांनी माहिती घेतली त्यानुसार काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्या आधारावर पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनी शोधला.
सुनीता पवार यांच्या घराशेजारीच स्वप्नील खातू याचे घर असून त्याच्या नवीन घराचे काम देखील सुरू आहे. तो मुंबईत बीएसटीमध्ये नोकरीला आहे. घराचे काम सुरू असल्याने तो येथे राहत होता. पवार यांच्या घरी देखील त्याचे येणे जाने होते. परंतु त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यातूनच पुढे नाट्य घडले आणि खुनापर्यंत विषय पोहचला असे तपासात पुढे आले आहे.
घटनेच्या दोन-तीन दिवस आधी मयत सुनीता यांनी स्वप्नील ला बेवडा म्हणून हिणवले होते. त्याचा प्रचंड राग त्याच्या डोक्यात होता. मंगळवारी कोणीही नाही ही संधी त्याने हेरली आणि सुनीता यांना “तू मला बेवडा” का बोललीस असा जाब विचारू लागला. त्यावेळी दोघांची बाचाबाची झाली. रागाच्या भरात स्वप्नील त्यांना ढकलून दिल्याने त्या खाली कोसळल्या. तीच संधी साधत जवळच असलेला सिलेंडर उचलून स्वप्नीलने त्याच्या डोक्यात घातला. त्या ठार झाल्याचे दिसताच स्वप्नील ने मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या हे दागिने उतरवले आणि घेऊन पसार झाला. ही घटना घडली तेव्हा घरात तसेच आजूबाजूला कोणीही नसल्याने कोणालाच या घटनेची कल्पना नव्हती. त्यामुळे तपास करताना पोलिसांसमोर देखील अनेक प्रश्न होते. परंतु सखोल माहिती घेतल्यानंतर पोलिसांचा संशय थेट शेजारी राहणाऱ्या स्वप्नीलकडे गेला.
अखेर बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता पोलिसांनी स्वप्नील खातू याला ताब्यात घेतले. परंतु तो सरळ माहिती देत नव्हता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्याने सर्वत्र कौतुक होत असून आता कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.