गुहागर – गुहागर तालुक्यातील अमोल नरवणकर आणि विशाल साळुंखे यांनी हिमाचल प्रदेश मधील माऊंट युनाम हे 6 हजार 111 मीटर उंचीचे शिखर सर केले आहे. युनाम पर्वत सर केल्यानंतर तिरंगा फडकवीत या दोघांनी मोहीम फत्ते केली. गुहागर तालुक्यात या दोघांच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अभिनंदन करीत कौतुक केले.
पुण्यातील एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांच्या नेतृत्वाखाली अमोल नरवणकर आणि विशाल साळुंखे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. यासाठी दोघांनाही टीडब्ल्यूजेच्या सह्याद्री वेडा या ग्रुपने सहकार्य केले. हिमाचल प्रदेशातील मनाली लेह रोड वरील लाहौल स्पिती या परिसरातील भरतपूर बेस वरून ट्रेकिंगला सुरुवात केली. आठ दिवसात तेथील वातावरणाशी जुळवून घेत मनाली, केलाँग,झिंग झिंग बार व मग भरतपूर वरून 6 हजार 111 मीटर उंचीचं माऊंट युनाम शिखर सर केलं . यावेळी वेगाने वाहणारे थंड वारे, कमी तापमाणामुळे हाडे गोठवणारी थंडी, प्राणवायुची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे शिखर सर केले. या दोघांनी गुहागर तालुक्यातील युवा पिढीपुढे आपल्या धाडसाचा नवा आदर्श ठेवला आहे.
अमोल नरवणकर याला पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड आहे. सह्याद्री वेडा ग्रुपच्या माध्यमातून सह्याद्री पर्वत रंगांमध्ये अनेकवेळा साहसी ट्रेकिंग केले आहे. अशा धाडसी गिर्यारोहणात सातत्य ठेवण्याचा त्याचा विचार आहे. याबाबत विचारले असता, गुहागरातील तरुणांनीहि पुढे येऊन या क्षेत्राकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे. हे शिखर सर केल्याने स्वतःतील विलक्षण सामर्थ्याच दर्शन झालं. अद्भूत, अद्वितीय असा अनुभव होता, असे अमोल याने सांगितले. हा एक कठिण ट्रेक असल्याने गिर्यारोहकांना येथे जाण्यापुर्वी शरीराच्या तंदुरुस्तीची खुप काळजी घ्यावी लागते. अशा या अत्यंत कठीण शिखर सर केल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होता.