शृंगारतळीत नदीपात्रातही बांधकाम, प्रशासनाचे दुर्लक्ष…. कोणाचा आशीर्वाद ..? चर्चेला उधाण..

0
429
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. थेट नदीपात्रात बांधकाम करण्याचे प्रकार वाढले असून कोणत्यातरी राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हे बांधकाम सुरू असल्याने याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

शृंगारतळीत अनधिकृत बांधकामांचा विषय कित्येक वर्षे चर्चिला जातो. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शृंगारतळी वेळंब फाटा येथील नदी पात्रात प्रवाहाच्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम करून या ठिकाणी बांधकाम सुरु केले आहे. याची चर्चा संपूर्ण बाजारपेठेमध्ये होत आहे. याठिकाणी महामार्गावरून अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काम केले जात आहे.संबधित अधिकारी मात्र या ठिकाणाहून जा – ये करत असतात. डोळ्यांवर पट्टी बांधत आपल्याला काही माहित नसल्याचे जनतेला दाखवत आहेत. तसेच संपूर्ण बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूने असलेल्या फूटपाथ, गटारांच्या बांधकामावरदेखील लहान-मोठी अतिक्रमणे दिसून येतात. मात्र, ठोस कारवाई करण्यात प्रशासनाला अजूनही अपयशच आलेले आहे.

शृंगारतळीतील वेळंब फाट्याजवळ नदीपात्रात रात्रीच्या वेळी अनधिकृत बांधकाम होत असल्याची ओरड आहे. तसेच शृंगारतळी मधील गुहागर साईडला जाणाऱ्या रस्त्यावर वरील नदीपात्रात नदीपात्र अरुंद करून बांधकाम सुरू आहे.मात्र, प्रत्यक्षात याविरोधात कोणीही आवाज उठविलेला नाही किंवा ग्रा.पं. लक्ष दिलेले नाही. रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या या बांधकामांना नक्की कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. अगोदरच हे नदीपात्र कमी झाले आहे. पावसाळ्यात पाणी वाहण्यास अडथळे येतात. अशा स्थितीत नदीकिनारी सुरु असणारी ही अनधिकृत बांधकामे बकालपणा आणत आहेत. भविष्यात अशी बांधकामे वाढण्याची भीती काही व्यापारी, नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत शुंगारतळी सरपंच विजय तेलगडे यांना संपर्क साधला असता या कोणत्याही बांधकामना आम्ही परवानगी दिलेली नाही अशी माहिती दिली आणि आपण या बांधकामाबाबत त्वरित माहिती घेऊन प्रशासनाला कळवू असे त्यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here