राजकारण ; ऑल इज नॉट वेल…

0
237
बातम्या शेअर करा

शिंदे-फडणवीस- पवार सरकारचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन एकदाचे ‘पार पडले’. कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील धक्काबुक्कीने अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपला. अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेहमीच्या शैलीत धुव्वादार शाब्दिक आतषबाजी केली. विरोधकांना व्याजासकट प्रतिउत्तरही दिले. पण शेवटच्या दिवसाच्या अखेरीस चर्चा झाली ती थोरवे-भुसेंच्या धक्काबुक्कीचीच. आमदार थोरवेंनी काहीशी चकमक झाल्याची थेट कबुलीच दिली. हे भांडण निधीवाटपाचे असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. पण मंत्री दादा भुसे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी असे काहीच न घडल्याचा आव आणला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर काहीही वावगं झालं नसल्याचं सभागृहात दरडावणीच्या सुरात स्पष्ट केलं.

विधानभवन परिसरात आ. थोरवे माध्यमांना सामोरे जात असताना मंत्री शंभूराज देसाईंनी ‘काही बोलू नका’ असं थोरवेंच्या कानात सांगितलं, हे स्पष्टपणे माध्यमांकडून चित्रितही झालं. विधानसभा निवडणुकीला अवघे सहा महिने राहिल्याने सर्वच आमदारांची घालमेल वाढली आहे. महागाई, बेरोजगारीचा प्रश्न समोर असताना आरक्षणाच्या गुंत्याने त्यात अजूनच भर टाकली आहे. त्यामुळे अँटी इंन्कंम्बन्सीचा फटका बसेल, या भीतीमुळे सर्वच विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता वाढीला लागली आहे. त्यातूनच काही दिवसांपूर्वी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाडांचे ‘पोलीस स्टेशन फायरींग’ हे भयंकर प्रकरण घडले होते. आज तर भास्कर जाधव आणि आशिष शेलार या दोन कोकणी फायरब्रँड नेत्यांनी सभागृहात एकमेकाला ‘अरेतुरे’ची भाषा वापरली. सध्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यात शिंदे शिवसेनेच्या आमदारांमधील अस्वस्थता ठळकपणे दिसू लागली आहे. मध्यंतरी शिंदेंचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड वाह्यात बोलण्यामुळे अडचणीत आले होते. वाघ शिकारीचे मोठेपण सांगण्याची भानगड त्यांच्या अंगाशी आली होती. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. शिंदेंच्या कारभाराची गाडी सुसाट जात असली तरी त्यांचे आमदार मात्र त्यांना कायम वारंवार नकारात्मक चर्चेत आणत आहेत. ठाकरे सेनेचे आमदार आधीच सैरभैर आहेत. खालच्या सभागृहात भास्कर जाधव तर परिषदेत परब आणि दानवे सोडले तर उबाठाचे आमदार म्हणावे तेवढे आक्रमक होताना दिसत नाहीत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यावरही नवीन मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासारख्या आमदारांची मंत्रिपद मिळण्याची आशा आता जवळपास मावळल्यात जमा आहे. काँग्रेसने या अधिवेशनात आपल्यापरीने विरोधी पक्षाचे काम पार पाडले. पण गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाणांनी ‘कमळ’ फुलवल्याने त्या घटनेची गडद छाया काँग्रेसींवर दिसत होती.
भाजपच्या मंत्री, आमदारांची स्थिती वरकरणी ठीकठाक वाटत होती. पण भाजपवाल्यांच्या देहबोलीत असुरक्षितता आणि काहीसा कृत्रिमपणा दिसत होता. सत्तेत असूनही ‘समाधान’ नाही, अशी त्यांची स्थिती झालेली दिसली. दोन पवारांमध्ये विभागल्याने नेहमीच ‘पॉवरगेम’ करणाऱ्या राष्ट्रवादीतील ‘पॉवर’च गेल्याचे स्पष्टपणे जाणवले. नाही म्हणायला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व रोहित पवारांनी किल्ला लढवला. या अधिवेशनाचा शेवटचा दिवस बऱ्यापैकी हॅपनींग झाला असताना ठाकरे पिता-पुत्राची अनुपस्थिती मात्र ठळकपणे अधोरेखित झाली. त्यातच ठाकरे फॅमिलीचा जामनगरमधील ‘अंबानी मॅरेज पार्टी’तील फोटो माध्यमांमधून समोर आल्याने तो राजकीय चर्चेचा विषय ठरला. रोहीत पवारांप्रमाणे छोट्या ठाकरेंनीही (आदित्य ठाकरे) राजकीय विरोधकांना धीरोदात्तपणे सामोरे जायला हवे, अशी कुजबूज राजकीय वर्तुळातून ऐकू येऊ लागली आहे. सेनापती प्रत्यक्ष मैदानात असेल तर लढाई लढताना सैन्याला ‘पॉवर’ मिळते, हे साधे गणित ठाकरेंना ज्यावेळी कळेल त्यावेळी उरलेल्या सेनेला नक्कीच नवी उर्जा मिळेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here