चिपळूण – चिपळूण तालुक्यातील वालोपे-वरचीवाडी येथील लक्ष्मी अनंत हरचिरकर या ७० वर्षीय वृद्धेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करून शेतात फरफटत नेत निर्घृणपणे ठार मारून शेतात मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला आहे. जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आला असून तो नात्यातील जवळच्याच व्यक्तीने केला असल्याचा संशय मयत वृद्धेच्या मुलाने केला आहे.
लक्ष्मी हरचिरकर ही वृद्ध महिला आपल्या दोन मुलांच्या बरोबर वालोपे वरचीवाडी येथे राहत होती.सामायिक जमिनीवरून हरचिरकर कुटुंबात गेले काही महिने वाद सुरू होते.अनेकवेळा या विषयावरून भांडणे देखील होत होती.परंतु जमिनीचा हा वाद इतका पराकोटीला जाईल याची कल्पना कोणालाच नव्हती.आशा परिस्थितीत लक्ष्मी हरचिरकर ही दोनच दिवसापूर्वी ती पंढरपूर यात्रा करून आली होती.
मयत वृद्धा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेली.तेव्हा छोटा मुलगा घरात होता.परंतु दुपारी २ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही.त्यामुळे मुलाने शोधाशोध सुरू केली.आजूबाजुला थांगपत्ता न लागल्याने मुलाने थेट शेतात धाव घेतली.परंतु शेतात देखील दिसून आली नाही म्हणून त्याने आईला हाका मारण्यास सुरुवात केली.मात्र प्रतिउत्तर मिळालेच नाही.अखेर हवालदिल झालेल्या मुलाने शेतातच शोधाशोध सुरू केली.आणि भयानक वास्तव समोर आले.
शेतात आजूबाजूला शोध घेत असतानाच बाजूच्या शेतातुन धूर येत असल्याचे त्या तरुणाच्या निदर्शनास आले.धूर कसला हे पाहण्यासाठी तो त्याठिकाणी पोहचला आणि समोरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकरली.शेतात चक्क मृतदेह जळत असल्याचे आणि त्यामध्ये आपल्या आईची साडी दिसत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले तेव्हा जणू त्याचा थरकाप उडाला.प्रकरण नेमके काय ?हेच त्याच्या लक्षात येत नव्हते.अखेर त्याने धीर करून गावातील लोकांना बोलावून घेतले.
गावचे पोलीस पाटील भालचंद्र कदम,तसेच सरपंच अनिशा काजवे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.समोरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.मृतदेह पूर्ण जाळलेला नव्हता तर काही अवशेष दिसून येत होते.मयतची साडी देखील दिसून येत होती.त्यामुळे हा लक्ष्मी हरचिरकर या महिलेचाच मृतदेह असल्याची खात्री त्यांना झाली आणि थेट चिपळूण पोलिसांना माहिती देण्यात आली.ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी पोहचले.पाठोपाठ डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने हे देखील त्याठिकाणी पोहचले.त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली तेव्हा पोलिसांच्या समोर देखील अनेक महत्वाचे धागेदोरे समोर आले.त्यामुळे पोलिसांनी देखील तातडीने कार्यवाहिला सुरुवात केली.
सर्व ग्रामस्थांच्या व मयताच्या मुलांसमोर पोलिसांनी जेव्हा परिसराची पाहणी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले.मयत महिलेला प्रथम मारहाण करण्यात आली. मारहाणीत निघालेले रक्त एका ठिकाणी पडलेले दिसून आले.त्यानंतर बाजूच्या शेतापर्यंत चक्क अमानुषपणे फरफटत घेऊन गेल्याच्या खुणा पोलिसांना स्पष्टपणे शेतात दिसून येत होत्या.त्यामुळे मयत वृद्धेला प्रथम बेदम मारहाण करण्यात आली.त्यामध्ये तिचा जीव गेला असावा असा संशय पोलिसांना निर्माण झाला. बेदम मारहाण करून ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सशयिताने मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा संशय आहे.हा चक्क खुनच असून या निर्णयापर्यंत पोलीस पोहचले आहेत.त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मयत लक्ष्मी हिच्या मुलाने पोलिसांकडे या संदर्भात स्पष्टपणे संशय व्यक्त केला असून आमचे जमिनीचे वाद असून त्यातूनच हा खून करण्यात आला आहे.तो व्यक्ती आमच्या जवळचा असून त्याचे नाव देखील मयतच्या मुलाने पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने हे अमानुष कृत्य केले असल्याचे समोर आले असून पोलिसांनी संशयित व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.