गुहागर – भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेश राणे यांचा 16
फेब्रुवारी रोजी गुहागर दौरा असून पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर त्यांची जंगी सभा होणार आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांनी सभा घेऊन राणे कुटुंबियांवर टीका केली होती. त्यामुळे याला निलेश राणे आ. जाधव यांच्या मतदारसंघात येऊन त्यांना कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे असून ही सभा वादळी होणार
असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यात गेले काही महिने भाजपच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. यातच भर म्हणून आक्रमक ओळखले जाणारे नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांची जंगी सभा गुहागर मतदारसंघात आयोजित करण्यात आली आहे. जनसंवाद दौऱ्यानिमित्त ४ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंची सभा कणकवलीत झाली. त्यावेळी आमदार भास्कर
जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार निशाणा साधला होता. शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांनी नारायण राणेंविषयी केलेलं विधानही भास्कर जाधवांनी यावेळी बोलून दाखवले होते. यानंतर राणे पिता-पुत्र आक्रमक झाले होते. याचदरम्यान, नारायण राणे यांनी आमदार जाधव यांना चोप देणार असल्याचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच निलेश राणे यांनी आमदार जाधव यांच्या मतदारसंघात जाऊन सडेतोड उत्तर देणार असल्याचे
म्हटले होते.
आता 16 फेब्रुवारीला निलेश राणे यांची सभा गुहागर तालुक्यात होत आहे. या निमित्त आज सोमवारी शंृगारतळीत तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सचिन ओक, बावा भालेकर, यशवंत बाईत, महेश कोळवणकर, विश्वास बेलवलकर आदी उपस्थित होते.