चिपळूण – चिपळूण व गुहागर तालुक्यात हातभट्टीची गावठी दारू जोमात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांच्या कारवाईतून हा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण, व गुहागर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवघ्या तीन ते चार दिवसात पाचजणांवर अवैधरित्या गावठी दारू बाळगणे, हातभट्टी लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
चिपळूण शहरासह व गुहागर ग्रामीण भागात ठिकठिकाणी गावठी दारू विक्रीचे धंदे राजरोसपणे सुरू असतानाही ते उत्पादन शुल्क विभागाच्या नजरेस पडत नाहीत, याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘गावठी’ जोमात आणि उत्पादन शुल्क विभाग ‘कोमात’ अशीच काहीशी विचित्र परिस्थितीत तालुक्यात निर्माण झाली आहे. हातभट्टीची गावठी दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला शासनाकडूनच बंदी आहे. असे असतानाही पैशांच्या हव्यासापोटी अनेकजण नियम धाब्यावर बसवून गावठी दारू तयार करण्याबरोबरच तिची अवैधरित्या विक्रीही करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात अशा दारूची विक्री केंद्र अधिक आहेत. काहीजण आपल्या घरामध्ये, घराच्या पाठीमागील बाजूस, झाडीझुडपात, नदीच्या किनारी, निर्जनस्थळी असे प्रकार बेधडकपणे करीत आहेत. समाजातील वयोवृध्दांसह प्रौढ आणि तरूण पिढीही या गावठी दारूच्या आहारी गेलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे कित्येक संसार रस्त्यावर आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष अशा प्रकारांना खतपाणी घालत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
चिपळूण व गुहागर तालुक्यात कुठेच गावठी दारूची निर्मिती आणि विक्री होऊ नये याची मोठी जबाबदारी उत्पादन शुल्क विभागावर आहे. मात्र, पोलिसांनी ज्या प्रकारे गावठी दारू विक्री विरोधात कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे त्यातून उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांच्या भूमिकांविषयी मात्र शंका निर्माण होत आहे. या विभागाचे अधिकारी नक्की करताहेत काय?, अवैध मद्य विक्रीच्या धंद्यांवर कारवाई का करीत नाहीत? यांसारखे अनेक प्रश्न आता जनतेतून उपस्थित केले जात आहेत.
फेब्रुवारी महिन्यात गेल्या तीन ते चार दिवसांत गावठी दारू संदर्भात पाच गुन्ह्यांची नोंद सावर्डे, चिपळूण आणि अलोर-शिरगाव पोलीस स्थानकात झाली आहे. संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हेही दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या कारवाईनंतरही या गावठी दारू विक्रीला चाप बसलेला नाही. दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास पोफळी शिर्केवाडी येथील कारवाईत पोलिसांनी पाचशे रूपयांच्या किंमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त केली. तर कापसाळ मोरेवाडी येथे केलेल्या कारवाईत सातशे रूपये किंमतीची १४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर गुहागर तालुक्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात अद्याप पर्यंत सहा गावठी दारूवर कारवाई करण्यात आली आहे.