सांगली – सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पर्यावरणपूरक परिसर, स्वच्छता, क्रीडा सोयी, वृक्ष लागवड आणि मनाला शांती देणाऱ्या पोलीस स्टेशनची वास्तु पाहून महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल भारावून गेले आणि त्यांच्या तोंडातून आपसूकच “Excellent” अशी स्तुतीसुमने उधळली गेली.
नुकतच डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली, याप्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, राज्य महामार्ग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक लता फड, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणीलकुमार गिल्डा, जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील उपस्थित होते. या भेटीदरम्यान डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कुपवाड एमआयडीसी परिसरात लावलेल्या विविध औषधी झाडे, फळझाडे यांची पाहणी केली. तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी मित्रांची शारीरिक सुदृढता राखण्यासाठी तयार केलेल्या व्हॉलीबॉल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅकचेही निरीक्षण करुन प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांचे कौतुक केले, आणि राज्यांमधील अग्रगण्य पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पोलीस ठाणेचे स्थान नक्कीच आहे, असे गुणगान गायले. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.