गुहागर – गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार सज्ज झाले असून आतापर्यंत आगारातून तब्बल ४०७ गाड्या बुक झाल्या आहेत. २३ सप्टेंबरपासून मुंबई, पुणेसह राज्यातील विविध भागात गुहागर आगारातर्फे या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख सौ. सोनाली कांबळे यांनी दिली.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील गणेश भक्त चाकरमानी आपापल्या घरी येऊन पोहोचले आहेत. ट्रेन, खाजगी ट्रॅव्हल्स, भाड्याच्या किंवा स्वतःच्या कार व एसटीच्या माध्यमातून गणेश भक्तांनी आपल्या घरी हा सण उत्साहात साजरा केला. परंतु हे करत असतानाच या सर्वांचे लक्ष परतीच्या प्रवासाकडे लागले होते. २३ सप्टेंबर पासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मात्र, यावर्षी त्यामधे जवळपास तीप्पट गाड्यांची भर पडली असून तब्बल ४०७ जादा गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, विरार, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, बोरीवली, विठ्ठलवाडी, कल्याण अशा विविध मार्गावर या बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या जादा गाडया असल्या तरी कोणत्याही प्रकारचा जादा भार प्रवाशांवर टाकलेला नसून सर्व साध्या दरातील तिकीटात प्रवाशांना सेवा उपलव्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बुक झालेल्या जादा गाडया राज्यातील इतर आगारामधून मागविल्या असून आगारातून रोजच्या सुटणाऱ्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या नियोजनावर त्याचा पारिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.