चिपळूण- चिपळूण तालुक्यातील मिरजोळी आणि शिरळ या ठिकाणी झालेल्या हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात एकूण दहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत शकील पेवेकर यांच्या डोक्यात हातोडीने प्रहार करण्यात आला. तर अमित मोरे याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळी येथील एका टपरीवर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काहीजण गप्पा मारत होते. त्यावेळी साद शकील पेवेकर हा आपल्या चुलत भावाला घेऊन तिथे आला. याचदरम्यान साजिद बेबल नावाची व्यक्ती तेथे आली. आणि काही वेळ गप्पा झाल्यानंतर साद आणि साजिद यांच्यात बाचाबाची सुरू झाली. रागाच्या भरात साजिदने सादच्या श्रीमुखात भडकवली. तेव्हा साद ने आपले वडील शकील पेवेकर यांना त्याठिकाणी बोलवले. माझ्या मुलाला तू का मारले म्हणून शकील हे साजिदला जाब विचारू लागले. यावरून पुन्हा बाचाबाची सुरू झाली. ही बाचाबाची सुरू असतानाच एकाने जवळच असलेला हातोडा उचलला आणि शकील यांच्या डोक्यात त्या हातोड्याने जोरदार वार केला. घाव वर्मी लागल्याने शकील हे थेट जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी फिर्याद साद पेवेकर याने पोलिसांकडे दिली आहे.
दरम्यान, हा वाद तेवढ्यावरच शमला नाही. बुधवारी मध्यरात्री काहीजण पुन्हा शिरळ येथे गेले आणि तिथे पुन्हा जोरदार हाणामारी झाली. लाथाबुक्के, दगड आणि धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. यात अमित मोरे याच्यावर शस्त्राचा वार करण्यात आला. जखमी अवस्थेत त्यालाही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार साजिद बेबल व अन्य नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.