चिपळूण – चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणात हद्दीच्या कारणावरून शोध तपासात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची यावी तसेच निलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
चिपळूण तालुक्यातील मौजे ओमळी येथील निलिमा चव्हाण हिच्या कुटुंबाची भेट घेतली असता तिचा भाऊ अक्षय चव्हाण यांने सांगितले की २९ जुलै २०२३ रोजी त्यांच्या बहिणीने त्याला फोन करून घरी येते असे सांगितले होते. मात्र उशिर झाला तरी ती घरी आली नाही म्हणून त्याने आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार चिपळूण पोलिस ठाणे येथे देण्यासाठी गेला असता त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक व पोलिस यांनी बहिणीचा शोध घेण्यास हलगर्जीपणा दाखविला. त्यावेळी त्यांना तिचा भाऊ मोबाईल लोकेशन दाखवत होता. मात्र, हे आपल्या हद्दीत मोडत नसल्याचे कारण सांगून शोध घेण्यास टाळटाळ केली. जर त्याचवेळी चिपळूण पोलिस ठाणे येथील पोलिसांनी सहकार्य केले असते तर आपली बहीण निलिमा सुखरूप भेटली असती त्यामुळे अशा पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आपल्याकडे केली आहे.
त्यानुसार निलिमा चव्हाण हिच्या शोध मोहिमेत हद्दीच्या कारणावरून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांची खाते निहाय चौकशी करावी तसेच निलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरेल, यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण, तहसिलदार चिपळूण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना सादर केल्या आहेत.