दापोली – दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा २९ जुलैपासून बेपत्ता झाली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते असे सांगून ती निघाली होती. मात्र दाभोळच्या किनारी चार दिवसांपूर्वी तिचा मृतदेह मिळाला. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र नंतर नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला.
नीलिमा ही खेड-चिपळूण या एसटी बसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. यावेळी ती एका जोडप्याला भेटल्याचे दिसत आहे. यातील तरुणाची पोलिसांनी चौकशी केली असून या तरुणाची पत्नी ही नीलिमाची मैत्रीण असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यांना दोन मिनिटे भेटून ती पुढे प्रवासाला गेली त्यामुळे तूर्तास तरी या तरुणाचा या प्रकरणामध्ये कोणताही संबंध दिसत नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही हा विषय पावसाळी अधिवेशनात अधिवेशनात सभागृहात मांडला आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी आता जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांच्या विविध यंत्रणांची पथके तपास करत आहेत तसेच शनिवारी दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा ती नेहमी आपल्या गावी जात असे. शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून मी सकाळी गावी येणार आहे असेही कळवले होते. परंतु तिचे हेच शब्द घरच्यांसाठी अखेरचे ठरले. ती घरी परतलीच नाही. तिचा व्हीसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे सत्य समोर येणार आहे.