गुहागर– गुहागर तालुक्यातील जानवळे पक्क्या रस्त्यापासून कमलेश्वरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने येथील नवतरुण मंडळ तेलीवाडी व म्हादलेकरवाडी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने असहकार्य केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन हे काम हाती घेतले.
या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नवतरुण मंडळ तेलीवाडी व म्हादलेकरवाडी आणि ग्रामस्थांनी जानवळे ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली होती. पक्क्या रस्त्यापासून ते कमलेश्वरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे शासनाच्या मंजुरीतून खडीकरण झाले आहे. या रस्त्यावर खूप खड्डे पडले होते. पावसाळ्यात तर खूपच दयनीय अवस्था या रस्त्याची होते. रस्त्यावरुन वाहन किंवा आजारी पडलेल्या माणसाला सुध्दा उपचारासाठी वाहनातून नेताना अवघड होते. पावसामुळे वाहने चिखलात रुततात व मध्येच बंदही पडतात. त्यामुळे कोणताही वाहनचालक वाहन या रस्त्याने नेत नाही. तेलीवाडी व म्हादलेकरवाडी या मुख्य वाड्यांना याचा मोठा त्रास होत होता. श्रावण महिन्यात कमलेश्वर मंदिराकडे उत्सवाला जाणाऱ्या भक्तांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हीच स्थिती गणेश उत्सवातही असल्याने ग्रामपंचायतीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती मात्र, ग्रामपंचायतीने असहकार्य केल्याने श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.
बंधाऱ्यातील गाळ उपसाही केला
जानवळे तेलीवाडी-म्हादलेवाडी येथील नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदी पात्रामध्ये पाणी अडल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाली. तसेच शेतीसाठीदेखील या पाण्याचा उपयोग होतो. परंतु मागील ३ वर्षापासून या बंधाऱ्यामध्ये पावसाच्या पाण्याने येणाऱ्या गाळामुळे हा बंधारा भरुन गेला होता. त्यामुळे येथील गाळ उपसा केल्यास पाण्याचा साठा होऊन मुबलक पाणी मिळणार असल्याने पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्यामधील गाळ उपसा करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली होती मात्र, तेथेही ग्रामपंचायतीने लक्ष न दिल्याने अखेर श्रमदानातून ग्रामस्थांकडून गाळ काढण्यात आला.