मार्गताम्हाणे – चिपळूण-गुहागर मार्गावरील उमरोली येथील एका वळणावर दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.यश भगवान पालांडे व भावेश भगवान पालांडे अशी त्यांची नावे आहेत. अपघाताची ही घटना शुक्रवारी रात्री 12.30वाजण्याच्या सुमारास उमरोलीनजीक घडली.
भावेश व यश दोघेही दुचाकीने भरधाव वेगात मार्गताम्हाणेकडून चिपळूणच्या दिशेने जात असताना त्यांचा गाडीवर ताबा सुटून गाडी मोरीच्या कठड्यावर जोराने आदळली. यामध्ये गाडीचे अक्षरश: दोन तुकडे झाले तर अपघातात दोन्ही भावांना गंभीर दुखापत झाली. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काही वेळाने दुसर्याचाही मृत्यू झाला. अपघातात मृत्यू ओढवलेले यश व भावेश हे दोघेही मार्गताम्हाणे येथे आपल्या मामाकडे रहायला होते. मार्गताम्हाणे येथील नातू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. या दोन्ही भावांच्या झालेल्या अपघातीमुळे मृत्यूमुळे मार्गताम्हाणे येथे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीअंती खेड तालुक्यातील सार्पिली येथे त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.