गुहागर – गुहागर समुद्र किनारी प्रथमच स्पोर्ट फिशिंग असोसिएशन महाराष्ट्र सर्फ फिशिंग टुर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शृंगारतळी येथील गौरव वेल्हाळ यांना सर्वात जास्त वजनाचा मोठा मासा गळाला लागल्यामुळे गुहागरमधील पहिल्या स्पर्धेचा पहिला विजेता बनण्याचा मान मिळाला. या स्पर्धेमध्ये एकूण १०७ स्पर्धकांनी न थकता आपले नशीब आजमावले.
गुहागरमध्ये प्रथमच समुद्र किनारी ही स्पर्धा झाल्याने स्पर्धकांसह गुहागरवासीयही मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. या स्पर्धेचे नियम व अटींचे पालन करून ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्यकारणी अध्यक्ष संतोष कोळवणकर, उपाध्यक्ष आशितोष शेलार, खजिनदार मयूर झिंगे, तर सदस्यपदी संदीप दर्णे, मंदार सुर्वे, मंगेश माने, अवधूत वेल्हाळ, संतोष सावंत, अविनाश वेलिंगकर, पराग कोळी, सुरज भाटकर, अरुणभा सनिग्रही यांनी मेहनत घेतली. गुहागर तालुक्यात इतरवेळी समाजसेवेची धुरा खांद्यावर घेऊन चालणारा, प्रत्येकवेळी मदतीचा हात देणारा श्रृंगारतळीचा गौरव वेल्हाळ याने गुहागर समुद्र किनारी प्रथमच झालेल्या स्पोर्ट फिशिंग असोसिएशन महाराष्ट्र सर्फ फिशिंग टुर्नामेंट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याने सर्वत्र गौरव वेल्हाळ यांचे कौतुक करण्यात येत आहे.