कोकण रेल्वेमधील चोरीप्रकरणी गुहागर मधील एकास अटक; ७ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

0
2871
बातम्या शेअर करा

चिपळूण – दादर ते वैभववाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे चिपळूण रेल्वेस्थानकाजवळ एकाने ७ लाख २० हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अधिक तपासासाठी चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याची उकल करून एकाला जेरबंद केले आहे. या चोरट्याकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गितेश अशोक पवार (रा. कोतळूक, गुहागर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणातील महिला प्रवासी दिनांक ३ डिसेंबर रोजी, तुतारी एक्सप्रेसने दादर ते वैभववाडी असा प्रवास करत असताना सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, चिपळूण रेल्वे स्थानकाजवळ फिर्यादी गाढ झोपेत असताना एका इसमाने त्यांची पर्स चोरून नेली होती. यामध्ये एक मोबाईल, २० हजार रूपये रोख व ७ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा ऐवज होता. याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर अधिक तपासासाठी हा गुन्हा चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच एक पथक तयार करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरमाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत पारंपरिक तपास पद्धतीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यामधील आरोपी, गितेश अशोक पवार रा. कोतळूक, गुहागर, याला ठाणे जिल्ह्यातून दि. ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपीकडून, गुन्ह्यामधील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक, अरमाळकर, पोलीस नाईक पांचाळ, नाईक, दराडे, पोलीस शिपाई पडवी यांनी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here