चिपळूण- चिपळूण नगरपालिकेचे वादग्रस्त अभियंता परेश पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. इनायत मुकादम यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नगरपालिका आणि प्रामुख्याने परेश पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते व जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.
गेल्या अनेक वर्षापासून चिपळूण नगरपालिकेवर विविध आरोप होत यावेळेला मात्र तेच आरोप इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून इनायत मुकादम यांनी केल्यानंतर जोरदार खळबळ उडाली होती. नगरपालिका प्रशासनानेही धाबे दणाणले होते, मात्र इनायत मुकादम यांच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी चिपळूण नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पुढार्यांनी परेश पवार यांच्यासह डीवायएसपी सचिन बारी यांची भेट घेतली व इनायत मुकादम यांच्या विरोधातच निवेदन देऊन ते खोडसाळ आरोप करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदन प्रकरणामुळे भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन पवार यांना काही महिने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. तर पालिका प्रशासनाने पवार हे वैयक्तिक कारणास्तव रजेवर असल्याने गुहागर नगरपंचायतच्या अभियंत्याकडे चार्ज देण्यात आल्याचे सांगितले आहे.
नजीकच्या काळात इनायत मुकादम हे आणखी घोटाळे काढणार असल्याने प्रशासन त्याला कशा पद्धतीने तोंड देते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या आधी चिपळूण नगरपालिकेवर अजून कोणत्या प्रकारचे आरोप होतात आणि नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी त्यावर उत्तर देतात किंवा पुन्हा जो आरोप करतोय त्याच्या विरोधात तक्रार दाखल करतात का याची चर्चा सध्या संपूर्ण चिपळूण शहर रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.