चिपळूण – आपल्या स्वार्थी राजकारणासाठी ऐतिहासिक महापुरुषांबाबत होणाऱ्या वक्तव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र व्यथित झाला आहे. हे लोण चिपळूणसारख्या सुसंस्कृत शहरात पसरू नये आणि चिपळूणची संस्कृती टिकवून रहावी यासाठी माजी नगरसेवक शिरीष काटकर यांच्या प्रयत्नाने चिपळूणमध्ये सर्वपक्षीय आणि राजकारण विरहित सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या राज्याचे राजकीय वातावरण गढूळ झालेले आहे, आपल्या अस्मितेचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, हे कुठेतरी प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीला खटकत आहे. परंतु आपल्या चिपळूण शहरात आजपर्यंत जसे खेळीमेळीचे आणि सर्वांशी संबधित जे वातावरण राहीलेले आहे ते तसेच रहावे, आमच्या येथील कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून मर्यादेचे उल्लघंन आजपर्यंत झालेले नाही, ते वातावरण तसेच निकोप रहावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर यावेत, त्यांनी या शहरातील जातीधर्मामधील एकोपा, राजकारणाच्या पलीकडील संबंध जपले जावेत, यासाठी एक आदर्श घालावा आणि चिपळूणची संस्कृती महाराष्ट्राला समजावी, जेणेकरून इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा यासाठी ही सभा होणार असल्याचे काटकर यांनी म्हटले आहे. आपल्या चिपळूणमधील कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी हे राजकारणात नीतीमत्ता बाळगणारे आहेत आणि एका व्यासपीठावर येऊन एक आदर्श घालतील याच कल्पनेने या सभेचे नियोजन केलेले आहे. अशी सभा कुणीतरी घ्यायला हवी होती, त्याचे निमित्त मात्र शिरीष काटकर आहेत. त्यांनी संपूर्ण चिपळूणकरांच्या वतीने या सभेचे नियोजन केलेले आहे. गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता मध्यवर्ती एस. टी. स्टंँड जवळील माधव सभागृहामध्ये होणाऱ्या या सभेसाठी सर्वांनीच उपस्थित राहून राजकारणातील सुसंस्कृत चिपळूणकर आणि सुसंस्कृत नेते हे चित्र कोकणला आणि महाराष्ट्राला दाखवून देऊया असे आवाहन शिरीष काटकर यांनी केले आहे.