मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं.
मात्र, या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
मराठा नेते विनोद पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की एका नेत्याला एक तासापर्यंत मदत मिळाली नाही, तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल. वेळेवर मदत मिळाली असती तर आमचा नेता वाचला असता. सरकार याबद्दल चौकशी करेलच. मात्र आम्ही आमचा नेता गमावला, असंही ते म्हणाले.
मेटे यांच्या सहकाऱ्याने सांगितलं की आमचा अपघात ५ वाजता झाला. मदतीसाठी ६ वाजता धावून आले. एक तास मी एकटा मदतीसाठी याचना करत होतो. रस्त्यावर झोपलो होतो पण गाडी एकही थांबली नाही. कोण विनायक मेटे? कोणते आमदार आम्हाला काही माहिती नाही अशी फोन केल्यावर उत्तरं मिळाली. पूर्णपणे झोपेत होते हे कर्मचारी. कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली त्यांनी नावंही सांगितली नाहीत. मी शंभर नंबरवर मदत मागितली. शेवटी छोटा हत्ती चालला होता. त्याच्याकडे मदत मागितली
यावेळी मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हेदेखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी या अपघाताबद्दल बोलताना सांगितलं, की एका ट्रकने कट मारल्याने बीडकडून मुंबईकडे येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. मदतीसाठी अनेकदा कदम विनवणी करत होते. मात्र, कोणीही गाडी थांबवली नाही, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.
मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो. मग एका व्यक्तीने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं रुग्णवाहिका आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो, तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं.