गुहागर – राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून गुहागर तालुक्यातील गिमवी येथे यंत्राच्या सहाय्याने खरीप हंगामात भात रोपवाटीका तयार करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
त्यानिमित्त कृषि विभाग व शक्तीमान कंपनी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात येऊन शेतकऱ्यांना व चिपळूण – गुहागर तालुक्यातील कृषिविभागातील अधिकारी / कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले .शेतमजूरांची टंचाई व महागाईमुळे दिवसेंदिवस कोकणातील भातशेतीचे अर्थशास्त्र बिघडत चालले आहे . परीणामी भात लागवडीखालील क्षेत्र कमी होण्याची भिती आहे . यावर मात करण्यासाठी उपाय म्हणून यंत्राच्या सहाय्याने भात लागवड करुन वरील धोके व नुकसान टाळणे शक्य आहे . यंत्राच्या सहाय्याने भात लागवड केल्याने लावणीच्या वेळेत व खर्चात बचत होणार आहे . पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक फायदा होणार आहे . यंत्राच्या सहाय्याने भात लागवड करण्यासाठी लागणारी भात रोपवाटीका मॅटवर तयार करणे गरजेचे असते . त्यासाठी भात बियाणे चार दिवस रहु पध्दतीने भिजत ठेवून मोड आणणे , बेड तयार करुन रोपवाटीका मॅटवर तयार करण्याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सरपंच जाधव व उपसरपंच गावडे, उपविभागिय कृषिअधिकारी- चिपळूण राजेंद्र माने , गुहागर तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर,चिपळूण तालुका कृषिअधिकारी आडके , मंडळ कृषिअधिकारी चोथे , कोळी , भिंगार्डे , शेंडगे , यादव,सुभाष जाधव व मोठया संख्येने शेतकरी तसेच कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक उपस्थित होते .