संगमेश्वर ; अक्षय पडवळची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद मुंबई ते गोवा ५६७ किमी अंतर ४० तास १४ मिनिटात सहकार्‍यांसह केले पार

0
275
बातम्या शेअर करा

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील कोळंबेसारख्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या अक्षय पडवळ या तरुणाने रनरअपमध्ये उज्ज्वल करिअर निर्माण केलं आहे. गेली ४ वर्षे मॅरेथॉन स्पर्धांमधून धावपटू म्हणून यश मिळवणार्‍या या कोकणच्या पट्टयाने मुंबई ते गोवा हे ५६७ किलोमीटरचे अंतर ८ मित्रांच्या सहकार्याने ४० तास १४ मिनिटात पूर्ण केले आहे. त्याच्या या रेकॉर्डची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अक्षयच्या या रेकॉर्डच्या नोंदीने संगमेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुंबई, पुणे, गोवा यासांरख्या मोठया शहरातील मॅरेथॉन स्पधेर्र्त अक्षयने आतापर्यंत १८ सुवर्ण व रौप्य पदके पटकावली आहेत. त्याच्या या गुणांची दखल आर्मी भरतीचे कोच अनिल कोरवी यांनी घेतली. त्यांनी आपल्या रन हॉलिक्स अ‍ॅकॅडमी, ठाणेमध्ये त्याला आर्मी भरती ट्रेनरची जबाबदारी सोपवली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली ३० – ४० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

अक्षय पडवळ याचं कोळंबे येथे २०१६ ला १२ वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे तो मुंबईमध्ये नोकरीसाठी गेला. तिथे त्याला लॅब असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. यामध्ये तो समाधानी नव्हता. काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्याच्या मनात सतत येत होती. इच्छा असेल तर मार्ग दिसेल असचं काहीस झालं. २०१८ मध्ये त्याला जीममध्ये भूषण नावाचा मित्र भेटला. त्याच्यासोबत तो धावण्याचा सराव करत होता. नोकरी सांभाळून प्रॅक्टीस करणे त्याला अवघड जात होते. शेवटी त्याने नोकरी सोडली आणि अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धावण्याची प्रॅक्टीस सुरु केली. १६ जून २०१८ मध्ये मुंबई येथे झालेल्या पहिल्या इव्हेंटमध्ये २५ किलोमीटर अंतर २ तासात पूर्ण केले. येथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

त्यानंतर त्याने लगेचच २ सप्टेंबर २०१८ रोजी ठाणे येथे झालेल्या दुसर्‍या २१ किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. हे अंतर त्याने १ तास २४ मि. ११ सेकंदामध्ये पूर्ण केले. अशा त्याने १० हाफ मॅरेथॉनमध्ये २५ किमीच्या २ , १० किलोमीटरच्या ७ व ५ किलोमीटरच्या ६ एकूण १५ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये यश संपादन केलं. आणि त्यानंतर खरी स्पर्धा झाली मुंबई ते गोवा मॅरेथॉन स्पर्धा. या मोठया स्पर्धेत अतिशय नियोजनबध्द पध्दतीने मित्रांच्या सहाय्याने किलोमीटरची आखणी केली. प्रत्येकाच्या वाटाला ७१ किलोमीटर अंतर येणार होतं. साध चाललो तरी आपल्याला धाप लागते तर हे ७१ किलोमीटर धावायचं म्हटल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा आला असता परंतु हे तरुण न डगमगता जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर एकमेकांना साथ देत हे अंतर ४० तास १४ मिनिटात पूर्ण केलं.

अक्षय म्हणाला की, मला माझ्या परिवाराचं, गावाचं, राज्याचं, देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील गरजू, गरीब मुलांना सैनिक भरती, पोलीस भरती होण्यासाठी आपण सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार आहोत असे त्याने सांगितले. मॅरेथॉन साठी आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन आपण संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना देण्यास कटीबध्द आहोत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here