रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील काँग्रेस भुवन येथील एका लॉजवर शहर पोलिस व डिबी पथकाने छापा टाकून सुमारे 4 लाख 95 हजार रुपयांचा 99 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शियाद ए. के (25) आणि नजब मोईद नौफर (25, दोन्ही रा. केरळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पहाटे शहर पोलिसांचे गस्ती पथक रहाटाघर ते मांडवी जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना त्याठिकाणी हे दोघे पोलिसांना संशयितरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांची उडवीउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण दिल्ली ते केरळ जाणार असे जात असताना सायंकाळी रत्नागिरीत आल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसभुवन येथील निलराज लॉजमध्ये थांबल्याचेही सांगितले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना लॉजवर ते रहात असलेल्या रुमवर नेउन त्यांच्या सामानाची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना त्यांच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ सदृष्य मिळून आले.पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणी केली असता तो अंमली पदार्थच असल्याचे निष्पन्न झाले असून संशयितांनीही तो एमडी असल्याचे सांगितले. दरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर अंमली पदार्थ औषधीय मनःप्रभावी अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 22 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय यांनी केली.