दापोली – दापोली तालुक्यातील फरारे येथे कांदळवन कत्तल होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुयोग वैद्य यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली असून कांदळवन कत्तल करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार का ? अशी चर्चा सध्या संपूर्ण दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे.
दाभोळ खाडी ४ तालुक्यांना जोडणारी खाडी आहे. ही खाडी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर या तालुक्यांना जोडणाऱ्या भागातून जाते. दाभोळ खाडीकिनारी कांदळवनाची तोड करण्याची शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी कांदळवन आहे त्याठिकाणी सागरी जीवसृष्टी आणि पर्यावरण व सागरी जीवांच्या सवर्धनाच्यादृष्टीने भारत सरकारने पर्यावरण संरक्षण अधिनियम लागू केला आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार समुद्र, खाडी किंवा नदीकिनारी असणाऱ्या खारफुटीच्या झाडांना कायद्याने संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहे. खारफुटीच्या झाडांना नुकसान होईल अशा कोणत्याही कृत्यास कायद्याने बंदी आहे. मत्स्य जीव आणि अन्य सागरी जीवांच्या प्रजनन आणि पैदासीच्यादृष्टीने खारफुटीच्या झाडाची आवश्यकता असते. म्हणूनच हा नियम सपूर्ण राज्यात लागून आहे. मात्र, याच नियमांना फाट्यावर मारत दापोली तालुक्यातील फरारे जेटीशेजारी एका कंपनीची बोट लागण्यासाठी जेटी बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या जेटीसाठी दाभोळ खाडीकिनारी कांदळवन कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून ही कांदळवन कत्तल कुणाच्या आर्शिवादाने करण्यात आली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकिकडे सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या जमिनीतील झाड तोडले तरी वनविभाग व सामाजिक वनिकरण विभाग या कांदळवन कत्तलीकडे का डोळेझाक करते याची चर्चा आता कोपऱ्या कोपऱ्यात सुरु आहे. या कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिका कार्यकर्ते सुयोग वैद्य यांनी दापोली प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.