चिपळूण – मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून परशुराम ते खेरशेत दरम्यानच्या ३४किमी अंतराचे काम ईगल इन्फ्रा नामक कंपनी करत असून ह्या कामाकरिता कंपनीने जेसीबी,पोकलेन, डंपर आदी यंत्रणा भाड्याने घेतली असून ह्यात सर्वाधिक संख्या परराज्यातील डंपर्सची आहे.परराज्यातील डंपर्स चालक वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून बेभान व बेदरकारपणे डंपर्स चालवत असतात. खेरशेत ते फरशी तिठ्या पर्यंतच्या ३४किमी अंतरापर्यंत अनेकदा छोटेमोठे अपघात होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. परराज्यातील डंपर्स चालकांच्या बेजबाबदारपणामुळे चिपळूणमधील नागरिक व वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. ह्याबाबत ईगल कंपनीस माहिती असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
मागील आठवड्यात डंपर चालकाच्या हलगर्जीपणामुळे एक निष्पाप महाविद्यालयीन विद्यार्थीनीला नाहक जीव गमवावा लागला तर चार दिवसांपूर्वी कलंबस्ते येथे मद्यधुंद अवस्थेत बेभानपणे डंपर चालविणाऱ्या चालकास जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते मात्र सम्बधित कंपनीचे जनसंपर्क अधिकारी(पी आर ओ)जयंतीभाई यांनी त्या डंपर चालकास सेवेतून कमी करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिले. मात्र अद्यापही कंपनीने सदर डंपरचालकविरुद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले. बेभान व मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या परराज्यातील डंपर्सना बंदी करावी अन्यथा ईगल कंपनीकरिता काम करण्याऱ्या परराज्यातील एकही डंपर फिरू देणार नाही असा इशारावजा निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षने कंपनीच्या व्यवस्थापनास दिले आहे. तसेच अपघातास कारणीभूत असणाऱ्या डंपरचालकांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याऱ्या ईगल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध करावी करावी असे मागणीवजा निवेदन विभागीय पोलीस अधिकारी,विभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक चिपळूण ह्यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, तालुकाप्रमुख सूरज कदम, शहरप्रमुख उमेश गुरव, कक्ष कार्यालयप्रमुख अविनाश सावंत, उपतालुकप्रमुख विजय जाधव, स्वप्नील जाधव, कक्ष विभागप्रमुख बंटी मोरे, अजित पवार, सौरभ फागे आदी उपस्थित होते.