गुहागर गुहागर तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याच्या डांबरीकरणाला अध्यपाही मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे.या रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन झाले असून रस्त्याची खडी उखडून आली आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा खडी विस्कळीत झाली आहे.संबंधित कामाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधी देखील याकडे डोळेझाक करत आहेत.यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
गुहागर तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप हा मार्ग नेहमीच वर्दळीचा राहीला आहे.या मार्गाची दुरुस्ती अनेक वेळा केली गेली मात्र ठोस गटारांची व्यवस्था होत नसल्याने हा रस्ता अल्पावधीतच नादुरुस्त होऊन मोठं मोठे खड्डे पडले जातात.गेल्यावर्षी या मार्गावरील रस्त्याचे नव्याने काम हाती घेण्यात आले ठेकेदाराने केलेले हे डांबरीकरण देखील अर्धवट अवस्थेत असल्याने या रस्त्याची खडी साईडपट्टीकडून मोठ्या प्रमाणात उखडून येत आहे.तर काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डयाना मलमपट्टी करण्याचा केलेला प्रयत्नदेखील फसला असून येथील खडी उखडून आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले असून पुढील काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते.मात्र अद्याप याकडे ठेकेदाराने लक्ष न दिल्याने ही खडी उखडून जाऊन हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.तसेच या कामात ठेकेदाराशी काही साटेलोटे आहे का आणि ठेकेदाराला कामासाठी मुहूर्त कधी मिळणार असाही सवाल केला जात आहे.