चौथ्या शाश्वत पर्यटन परिषदेने दिली दिशा, पर्यटन वाढवणे ही एक मोहीम- विक्रांत जाधव

0
180
बातम्या शेअर करा

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे मंगळवारी अल्पबचत सभागृहात चौथ्या पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जि. प. चे अध्यक्ष विक्रांत जाधव, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उद्योजक शाळीग्राम खातू, इंद्रजित नागेशकर, सुबोध गरूड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, संतोष कामेरकर, हिरवळ संस्थेचे प्रमुख किशोर धारिया, संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर उपस्थित होते.

या वेळी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, पर्यटन चळवळ ही एक मोहीम आहे. ती अनेक वर्षे चालवणे आवश्यक आहे. पर्यटन सेवा सहकारी संस्थेच्या राजू भाटलेकर यांनी सलग चार परिषदा घेतल्या. यातून रत्नागिरीचा पर्यटन विकास साधण्याकरिता उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संस्कृती जपून पर्यटन विकास करण्याकरिता साऱ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मंदिरे, गडकिल्ल्यांचे जतन करण्याकरिता पर्यावरणही जपूया; परंतु त्यात काही अडचणी आल्यास पर्यायी मार्ग काढला पाहिजे. मी आज लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तरुण म्हणून बोलतो आहे. आपल्या जिल्ह्यात सायंकाळच्या वेळी विरंगुळ्यासाठी मोठे ठिकाण दिसत नाही. चिपळुणात विचार केला तर दोन-चार ठिकाणी भेळीच्या गाड्या लागलेल्या असतात. परंतु विरंगुळ्यासाठी चांगल्या ठिकाणाचा विकास करणे आवश्यक आहे.

या वेळी जाधव यांनी गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील फ्लोटिंग जेट्टी आणि उभारलेली गॅलरी पाडण्यात आल्याचे सांगितले. तसेच कांदळवनांमुळे चिपळूण, खेडला जोडणारा एक मोठा पूल होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त केली; परंतु २०१२ मध्ये तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी कांदळवनाचे क्षेत्र निश्चित करावे, कारण याची वाढ अनियंत्रित असते, असे सांगितले होते; परंतु आजपर्यंत असे क्षेत्र निश्चित केलेले नाही. त्यामुळे त्याचा फटका विकासकामांना बसत आहे. गुहागरमध्येही गॅलरीमुळे कासवांना धोका नसतानाही कासव बचावाचे कारण पुढे करण्यात आले आणि गॅलरी पाडावी लागली होती. याचा फटका पर्यटन विकासाला बसत असल्याचे आता दिसू लागले आहे, असे स्पष्टपणे सांगितले.

गुहागरमध्ये बीच शॅकसाठी बघितलेली जागासुद्धा एमएमबीची आहे. त्यांना भाडे द्यायला तयार असूनही ते व्यावसायिक दराने भाडे मागत आहेत. परंतु दोन्ही विभाग शासनाचेच असताना अशा प्रकारे अडचणींमुळे पर्यटन विकासात अडथळे येत असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.

या वेळी सुहास ठाकूरदेसाई आणि सुधीर रिसबूड यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विक्रांत जाधव, रमेश कीर यांच्यासह मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन राजू भाटलेकर यांनी सत्कार केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here