देवरुख – देवरुख बाजारपेठ येथे देवरूख आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी बुधवार दिनांक २६ जानेवारी रोजी भीक मांगो आंदोलन केले.
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यांसह विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी गत तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे एस.टी.कर्मचारी तीन महिने पगारापासून वंचित आहेत यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा असा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला असल्याचे बोल एसटी कर्मचाऱ्यांमधून उमटत आहेत. देवरूख आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी देवरुख बाजारपेठेत प्रत्येक दुकानात जाऊन भीक मांगो आंदोलन केले. हातात फलक घेऊन विविध घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात समीर शिंदे, दिलीप चव्हाण, आनंद दांडेकर, समीर खेतल, सुरेश शेळके, समीर खैरे, विवेक नलावडे, मिलिंद सोनवडेकर, आप्पा कोळी, सचिन कांबळे, विलास पेंढारी, प्रमोद निंबाळकर, विकास गंगावणे, शिवाजी पडघान यांसह एस. टी. कर्मचारी सहभागी झाले होते.
नको खाजगीकरण हवे शासनात विलीनीकरण, खाजगी ठेकेदारसाठी कामगारांना भिकेला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, दे दो बाबा दे दो राज्य सरकार के नाम से भी देदो, भांडवलदारांच्या दारात सरकार उभे आणि जनतेच्या दारात एसटी कामगार उभे, सरकार सत्तेसाठी भुकेला त्यांनी लावले एसटी कर्मचारी भीकेला, म्हणवता मराठी माणसांचा नेता का घेता जीव कष्टकरी एसटी कामगारांचा असे फलक एसटी कर्मचाऱ्यांनी हातामध्ये घेतले होते.