मुंबई – चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे चिपळूणकरांचे अतोनात नुकसान झालेच होते त्यात महापूर येऊन आता 4 महिने उलटूनही नद्यांमधील गाळ काढणे किंवा नद्यांचे खोलीकरण करणे यासाठी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक काम होताना दिसत नसल्याने पुन्हा अशा महाभयंकर परिस्थितीला सामोरे जायला नको यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागून गाळ काढण्याचे काम जोमाने सुरू झाले पाहिजे यासाठी चिपळूण बचाव समिती ने आंदोलने, जनजागृती व आता साखळी उपोषण सुरू केले आहे. गेले 4 महिन्यांपासून तसेच आत्ता चिपळूणकरांचे साखळी उपोषण सुरू असताना गाळ काढण्याच्या कामाला जोमाने सुरुवात व्हावी यासाठी आमदार शेखर निकम आटोकाट प्रयत्नशील आहेत.
आमदार शेखर निकम यांनी पहिल्या दिवशी या उपोषणस्थळी भेट दिली व जाहीर पाठिंबा दिला तर दुसऱ्याच दिवशी ते मुंबईत पोहोचले व जलसंपदामंत्री पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांनी भेट घेतली. गाळ उपसण्याच्या या सर्व कामासाठी लागणाऱ्या सर्व मशिन्स व यंत्रणांच्या डिझेल इंधन साठी निधी उपलब्ध होत नव्हता त्यासाठी अखेर आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालय येथे भेट घेऊन परिस्थितीत चे गांभीर्य लक्षात आणून दिले. आणि अखेर आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला आणि चिपळूण बचाव समिती च्या लढ्याला यश आले असे म्हणता येईल कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गुरुवारी सकाळी आमदार शेखर निकम यांना बोलावून घेतलं आणि येत्या हिवाळी अधिवेशनात गाळ काढण्यासाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले व तातडीने गाळ काढण्यास सुरूवात करा अशी सूचना केली. या वेळी जलसंपदा विभागाचे अभियंता तथा सचिव कपोले व अन्य अधिकारी उपस्थित होते. आमदार राजीनामा द्यायला निघालेत, लोकं उपोषणाला बसलेत, तुम्ही करताय काय, असे सांगत तातडीने चिपळूणमधील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाला साडेसात कोटी रुपये द्या, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कपोले यांना दिला आहे. पुरवणी यादीमध्ये यांत्रिकी विभागासाठी ७.३० कोटीची डीझेलसाठी तरतूद करतो, तुम्ही काम चालू करा, असेही ना. अजित पवार यांनी निर्देश दिले.