खेड – शिवसेनेचे गुहागर मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव यांनी खेड दौऱ्यावर असताना आज राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही पण या भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह खेड व गुहागर तालुक्यात राजकीय चर्चा,तर्कवितर्क सुरू झालेत.
आमदार भास्कर जाधव आज खेड येथे रुग्णवाहिक लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना बुके देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम सुधा उपस्थित होते. आमदार जाधव यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे. आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी मध्ये असतानाव माजी आमदार संजय कदम हे एकेकाळी उत्तम जवळचे सहकारी ओळखले जात. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेत गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या दोन कुणबी समाजातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला थेट आव्हान दिले. यामध्ये एका कुणबी नेत्याला विधानपरिषदेवर विचार करु असा शब्द देण्यात आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबुज गेले काही दिवस सुरू आहे.
दरम्यान खा. सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांचे असलेले शीतयुद्ध जिल्ह्यात माहीत आहे. या सगळया पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे विद्यमान भास्कर जाधव यांच्या भेटीला कमालीच महत्व प्राप्त झाले आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत त्यामुळे या भेटीमुळे राजकिय अर्थ लावले जात आहेत.