चिपळूण…(विशेष प्रतिनिधी )- चिपळूण तालुका शिवसेनेत शिवसेना प्रवक्ते आम.भास्कर जाधव आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यात आता उघड संघर्ष सुरू झाला आहे.भास्कर जाधवांचं फार मनावर घेऊ नका असा सल्ला सदानंद चव्हाण यांनी कुटरे गणात दिल्यानंतर त्याचे पडसाद चिपळूण शहरात उमटू लागले आहेत. कार्यकर्त्यांचं येणाऱ्या काळात दिसेल पण भास्कररावांनी मात्र नक्की मनावर घेतलय अशा चर्चा आता चिपळूण मध्ये सुरू झाल्या आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण महापुरानंतर पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय झाले.तर दुसरीकडे चिपळूण मतदार संघात दोन टर्म आमदार म्हणून काम केलेले गुहागरचे आमदार आणि भास्करराव जाधव पुन्हा आपल्या होम ग्राउंडवर वावरू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सावर्डे येथे या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांना डावलून भास्कररावांच्या प्रमुख उपस्थितीत एक मेळावा घेतला.या मेळाव्यात भास्करराव जाधव यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल करताना सदानंद चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.इथली शिवसेना उभी करताना आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला आहे याची आठवण करून देताना सदानंद चव्हाण यांनी कोणता संघर्ष केला असा रोखठोक सवाल त्यांनी केला.इतकेच नव्हे तर माझ्या ४९ हजार मतदारांना डिवचु नका असा इशाराही त्यांनी चव्हाण याना दिला. या मेळाव्याची चर्चा सुरू होताच सदानंद चव्हाण यांनी देखील कुटरे गणाचा भरगच्च दौरा करून शक्ती प्रदर्शन केले. कुटरे येथील मेळाव्यात चव्हाण यांनी विधानसभेचे रणशिंगच फुंकले.भास्कर जाधवाना कितीही आणि काहीही बोलुद्या त्यांचं काही मनावर घेऊ नका असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.सावर्डे आणि कुटरे येथील आजी माजी आमदारांच्या मेळाव्यानंतर या भागातच नव्हे तर चिपळूण तालुका शिवसेनेत भास्कर जाधव समर्थक विरुद्ध सदानंद चव्हाण समर्थक असे सरळ सरळ दोन गट तयार झाले आहेत.
दरम्यान आगामी चिपळूण नगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या निवडणुकीचे नेतृत्व नेमके कोण करणार हे देखिल महत्वाचे ठरणार आहे.राष्ट्रवादीत असताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे दिसताच भास्कर जाधव यांनी पक्षाच्या विरोधात स्वतंत्र उमेदवार उभे करून त्यातील काही उमेदवारांना जिंकूनही आणले.हा इतिहास लक्षात घेता यावेळी देखील चिपळूण नगरपालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आपल्या होम ग्राउंड वर वर्चस्व ठेवण्यासाठी भास्कर जाधव नगरपालिकेवर वर्चस्व ठेवण्याचा नक्की प्रयत्न करणार अशी चर्चा आहे.सदानंद चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वा पेक्षा भास्कर जाधव यांची आक्रमकता शिवसैनिकांना भावते त्यामुळे अलीकडे चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते भास्कर जाधव यांच्याशी संपर्क वाढवू लागले आहेत.सावर्डे येथील मेळाव्यात जबाबदारी घेतली चिपळूणवर पुन्हा भगवा फडकवू,कामाला लागा अशा सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना देताना त्यांनी आपल्या आगामी वाटचालीची दिशाच स्पष्ट केली.दुसरीकडे सदानंद चव्हाण यांनीही भास्कर जाधव यांना जशास तसे उत्तर दिले. भास्कर जाधवांचे काही मनावर घेवू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना देताना त्यांनी भास्कर जाधव यांची दखल घेत नसल्याचे सांगून टाकले.
शिवसेनेच्या या आजी माजी आमदारांचा संघर्ष आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विकोपाला जाणार अशीच चिन्हे आहेत.या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचं येणाऱ्या काळात दिसेल पण भास्कररावांनी मात्र नक्की मनावर घेतलय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.भास्कर जाधव यांनी मनावर घेतलय याचा अर्थ लवकरच दिसेल अशा प्रतिक्रिया जाधव समर्थक कार्यकर्ते आता व्यक्त करू लागलेत.