मुंबई – दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णायामुळे पोलीस दलातील तब्बल 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट फायदा होणार आहे. तसेच पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त होण्याची संधी मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर घेण्यात आलेल्या पदोन्नतीच्या या निर्णयामुळे पोलीस दलात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
पदोन्नतीचा नेमका निर्णय काय आहे ?
राज्य सरकारने पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अंमलदारास कमी कालावधीत अधिकारी पदावरुन निवृत्त होता येईल. या नव्या निर्णयामुळे अधिकारी दर्जाच्या पोलिसांची संख्या वाढेल. तसेच पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा तपासी अंमलदारांच्या संख्येमध्येही वाढ होईल. या निर्णयामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाचे मनोबल वाढेल. यामुळे गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.