संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे एका मध्यप्रदेशातील व्यक्तीला जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाने जेरबंद केले आहे. या व्यक्तिकडून तब्बल 162 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाला संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे गावठी बॉम्ब घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुरुवारी दहशतवाद विरोध पथकाने तातडीने या भागात सापळा रचला होता. शिवधामापूर गावच्या हद्दीत जंगल परिसरात असणाऱ्या एका बंद शेत घराशेजारी संशयित व्यक्ती आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये ही व्यक्ती मध्यप्रदेशातील राहणारी असून त्याने आपले नाव आबस उर्फ कल्लू कथालाल बहेलिया असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असणाऱ्या बॉक्समध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आल्या, त्यामुळे तातडीने श्वान व बॉम्ब शोधक पथकाला या पथकाने पाचारण केले. दहशतवाद विरोधी पथकाने याची माहिती वरिष्ठ अधिकारी व संगमेश्वर पोलीस स्थानकाला दिली. बॉम्ब शोधक पथकाने बॉक्समधील वस्तू या स्फोटक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कल्लू बहेलिया याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हे जिवंत गावठी बॉम्ब डूकर व रानटी प्राणी मारण्यासाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे संगमेश्वर पोलीस स्थानकात बहेलिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.