राजापूर – मुंबई गोवा महामार्गावर कोदवली, राजापूर येथील एका पेट्रोल पंपावरून तीन संशयित दुचाकी स्वारांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये बिबट्या वन्य प्राण्याची कातडी आढळून आल्याने वन्य प्राण्याच्या तस्करी बाबत आरोपी यांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. जयेश बाबी परब, दर्शन दयानंद गडेकर , दत्तप्रसाद राजेंद्र नाईक अशी तीन संशयितांची नावे आहेत. आरोपीकडून बिबट्या या प्राण्याची कातडी जप्त करुन घेतली आहे. वरील सर्व आरोपींनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ चा भंग केलेला आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे इतर मुद्देमाल दोन मोटरसायकल गाडी नं- MH ०७AM ३२९४ MH ०७ ११३४९ जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपीकडून जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. सदर आरोपींनी आपला गुन्हा कबुल केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील आरोपीना प्रथम वर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता श्री.ओमकार अनिल गांगण, सरकारी वकील यांनी सरकारची (वनविभागाची) बाजू योग्य रित्या न्यायालयासमोर मांडल्याने मे. न्यायालयाने सदर आरोपीना ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, सहा. वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड, वनपाल राजापूर, स.व.घाटगे, वनपाल लांजा दि.वि.आरेकर, वनपाल संगमेश्वर तौ.र.मुल्ला, वनरक्षक राजापूर सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले सागर पताडे, वनरक्षक साखरपा,. न्हा.नु.गावडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधिर, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा राहूल गुंठे यांनी कार्यवाही पार पाडली आहे.