बातम्या शेअर करा

अहमदपूर – (विशेष प्रतिनिधी )- अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमागील मुख्य काम कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व गुत्तेदाराच्या वादात पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात दंड आकारुनही गुत्तेदार दुर्लक्ष करीत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्वांनाच खडसावून पाणी उपलब्ध न केल्यास कारवाई करण्याची सूचना केली. मात्र असे असले तरी गुत्तेदार या आदेशाकडे किती लक्ष देतो यावरच अहमदपूर शहरातील पाणीपुरवठा चे भवितव्य अवलंबून असल्याचे सध्या चर्चिले जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अहमदपूर पाणीपुरवठ्याची मासिक बैठक घेतली जाते. बैठकीत सांगितलेल्या सूचनांचे गुत्तेदार व जीवन प्राधिकरणचे अभियंता पालन करत नाहीत. ठरवून दिल्याप्रमाणे काम होत
नाहीत. त्यामुळे वारंवार लेखी, तोंडी सूचना करून, तसेच दंड आकारुनही परिणाम झाला नाही. जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी पालिकेत आढावा बैठक घेतली. तेव्हा मागील बैठकीतील मुद्दे समोर आल्याने
प्रशासन अधिकारी संतापले. त्यांनी अहमदपूरकरांना ३१ ऑगस्टपर्यंत पाणी उपलब्ध करून न दिल्यास सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सांगितले. तेव्हा फिल्टर, मेकॅनिकल कामासाठी दोन महिने वेळ लागणार असल्याचे गुत्तेदाराने सांगितले, तसेच जलवाहिनी जोडणे, शहरातील जलवाहिनीची टेस्टिंग करणे ही कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे अहमदपूरकरांना आणखी दोन महिने मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही.

पालिका जीवन प्राधिकरण व गुत्तेदाराच्या समन्वयाअभावी अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अहमदपूर शहर लोकसंख्येच्या मानाने खूप मोठे असल्याने या शहराला नित्यनियमाने पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी येथील जनतेची असते. मात्र येथील नगरपालिका ही नेहमीच कर मात्र वर्षभराचा घेते आणि पाणी मात्र पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा देते. अहमदपूर शहराजवळ मोठे धरण आणि तलाव आहेत. त्यातून वर्षाचे बारा महिने पाणी उपलब्ध होत असताना ही पाणीपट्टी मात्र वर्षभराची आणि पाणी मात्र वर्षातून बारा किंवा चोवीस वेळा हे असं किती दिवस चालणार अशी चर्चा आता नागरिक करत आहेत. अनेकांनी तर नळपाणी योजना बंद करून कूपनलिकेद्वारे किंवा विकत पाणी घेण्याचा सल्ला देतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन त्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here