खेड : खेड तालुक्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला असल्याने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहिती नुसार सद्यस्थितीत १४ वर्षाखाली तब्बल २७ रुग्ण कोरोनाबाधित असल्याने लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला रोखायचे कसे? हा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे,
दोन आठवड्यांपुर्वी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या सुसेरी क्रमांक १ येथील देऊळवाडी येथील चार लहान बालकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या चारही बालकांवर येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले. सुदैवाने ही चारही बालके उपचारांना प्रतिसादही देत आहेत मात्र दरम्यानच्या काळात आणखी काही बालकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून यायला लागल्याने आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
फेब्रुवारी २०२१ पासून सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट भारच भयानक होती. या लाटेत अनेक युवकांचा बळी गेल्याने अनेक कुटुंब उद्धवस्त केली. व्यवसाय, नोकऱ्या गेल्याने आर्थिक घडी पुर्ण विस्कटून गेली. आता जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उबरट्यावर उभा असून लहान बालकांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार तालुक्यातील कोरेगाव शिंदेवाडी ३, खेड शह ३, लोटे १, सुसेरी ४ खोपी २. भोस्ते १, आष्टी ३, नांदगाव १, कळंबणी ३, धामणंद ३ तर तिसे येथे अशा एकूण २७ लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत.
या सर्व कोरोनाबाधित मुलांना आरोग्य विभागाकडून योग्य ते उपचार सुरु असून त्यांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
सर्व कोरोनाबाधित मुलं उपचारांना प्रतिसाद देत असली तरी मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढायला लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.