गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत गाव अखेर कोरोनामुक्त झाले आहे. या दरम्यान, हेदवी आरोग्य विभागाने येथे केलेली दमदार कामगिरी व गावाने राबविलेल्या कडक नियमावलीमुळे कोरोनावर विजय मिळविण्यास यश आले असून फिटे कोरोनाचे जाळे, मोकळे पालशेत गाव अशी चित्र सध्या दिसून येत आहे.
पालशेत गाव कोरोना विळख्यात सापडला होता. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने येथे हेदवी आरोग्य विभागान चाचण्या वाढवून उपाययोजना राबविल्या होत्या. विशेष म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामविकास कृती दल यांनी पुढाकार घेऊन येथे कडक निर्बंध लावले होते. गावात येणारे चाकरमानी, इतर जिल्ह्यातून येणारे नागरिक यांना येथे 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याशिवाय गावात कुणालाही प्रवेश नाही, असाही कडक नियम होता. क्वारंटाईन होण्यासाठी राहण्याची व्यवस्थाही गावातील शाळांमध्ये करण्यात आलेली होती. अशा पध्दतीने उपाययोजना राबविल्याने कोरोनाचे संक्रमण रोखण्यास बराच उपयोग झाला.
यामध्ये हेदवी आरोग्य विभागाची दमदार कामगिरी अधोरेखित करण्यासारखी आहे. वैद्यकीय अधिकारी डाँ. प्रताप गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 15 महिने आरोग्य कर्मचारी अंकीता पालकर, मदतनीस मीना नाटेकर, सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, ग्रामकृती दलाचे सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी विलास ओक, नाना पालकर या सर्वांनी सहकार्य केले. गावात फवारणी करण्यासाठी मोफत औषधे रिव्हरसाईड इंडस्ट्रीज लि. लोटेचे विलास पाटील, शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख अमरदीप परचुरे यांनी 300 लिटर सोडियम हायड्रोक्लोराइड मिळवून दिले. यासाठी मिनार पाटील व रविंद्र कानिटकर यांनी सहकार्य केले.