मुंबई – राज्य शासनाच्या निर्णयामुळे दुकानदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे करोनाच्या उत्परिवर्तीत (डेल्टा प्लस) विषाणूचा धोका, काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येण्याचे संकेत आहेत.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लागू असलेले कठोर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय २० दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांत विभागणी करण्यात आली होती.सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.