गुहागर – गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने
आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डाँ. विनय नातू यांनी हजेरी लावून एकप्रकारे मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनामनात जणू कमळच फुलविले. यावेळी त्यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करुन मनसे कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. नातू यांच्या मनसेच्या कार्यक्रमाला मनापासून लावलेल्या उपस्थितीने तालुक्यात मागमूसही नसलेल्या मनसेला ऐन पावसाळ्यात नवसंजीवनी देण्याचा डाँ. नातूंनी केलेला प्रयत्न चर्चेचा विषय ठरला आहे.
गुहागर तालुका मनसेची कोवीड आपत्तीत अलिकडे बरीच घोडदौड सुरु आहे. गरीब, गरजूंना मोफत धान्य पुरवणे, मास्क वाटप, लसीकरण शिबिरांना सहकार्य करणे, एवढेच नव्हे तर तोक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाला भेटी देणे, गुहागर – विजापूर रस्ता रुंदीकरणातील लांबलेली कामे, निकृष्ट बांधकाम याबाबत आवाज उठविणे असे लहान-मोठे कार्यक्रम, उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम गुहागर मनसेने हाती घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या दुतर्फा झाडे तोडण्यात आली. अशावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गिमवी ते मोडकाघर दरम्यान, वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज सोमवारी डाँ. विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आला. त्यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी डाँ. नातू यांचा सत्कार करण्यात आला. डाँ. नातू यांनी मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना पुस्तके भेट दिली. या वृक्षारोपणात सुमारे 500 रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती गुहागर मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी दिली. गुहागर मनसेचा वृक्षारोपणाचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने चर्चेला आला आहे तो डाँ. नातू यांच्या उपस्थितीने. गुहागरमध्ये कोणताही मागमूस
नसलेल्या मनसेला ऐन मान्सूनच्या तोंडावर डाँ. नातू यांनी जणूकाही संजीवनीच प्राप्त करुन दिल्याची भावना यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दिसून आली. यावेळी विनय नातू यांना काही पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी यावर उत्तर देणे टाळले. एकूणच गुहागर मनसेच्या वृक्षारोपणात कमळ फुलल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला गुहागर मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, महिला तालुकाध्यक्ष सानिया ठाकूर, विभाग महिला अध्यक्ष मयुरी शिगवण, वैभवी जानकर, तेजस गोपले, स्वप्नील कांबळे, संजय भुवड, दिनेश निवाते, रुपेश गव्हाले, नितीन कारकर, राहुल जाधव, संजोग देवकर, रितेश कळसुलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
