चिपळूण – चिपळूण तालुक्यातील रावळगाव येथे रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना सुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येत मिटिंग लावल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
चिपळूण – गुहागर मार्गावरील (तांबी ) रावळगाव येथील सुर्वेवाडी मधील सहाणेवर सत्तर ते ऐंशी ग्रामस्थ एकत्र येत गावातील काही विषयावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग लावली होती. या गावात कोरोनाने आधीच शिरकाव केलाय असे असताना सुद्धा शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत या गावच्या सरपंच यांनी ही मिटिंग आयोजित केल्याचे कळते. या गावच्या सरपंच या फ्रन्टलाइन वर्कर असतानासुद्धा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कडक लॉक डाऊनच्या आदेशाची पायमल्ली करत ही मिटिंग लावल्याचे बोलले जात आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी त्वरित ही मिटिंग आयोजित करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
या बाबात अधिक माहिती घेतली असता रावळगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू ,मटका या सारखे अवैध धंदे सुरू असल्याने या धंद्यांना लगाम लावावा किंवा हे धंदे बंद व्हावेत म्हणून ही विशेष सभा सरपंच यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र हे सर्व अवैध धंदे लॉकडाऊनच्या आधीपासून सुरू असताना याबाबत येथील सरपंच किंवा स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली होती का ? असा प्रश्न सुध्दा निर्माण झाला आहे.
एकीकडे रत्नागिरी जिल्हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात असताना अशाप्रकारे मीटिंग लावून कोरोना संक्रमण वाढविण्यासाठी ही सभा जर कारणीभूत ठरली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
अवैद्य धंदे जर बंदच करायचे होते तर याबाबत संबंधित यंत्रणेला याआधी कळवलं होतं का? संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केला होता का ? याबाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३ जून पासून 9 जून पर्यंत कडक लॉकडाऊन असताना अशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ही सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी पॉझिटिव्ह दर कमी व्हावा ,कोरोनाने होणारी मृत्यूंची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळे आदेश काढत त्याची अंमलबजावणी करत आहे. मात्र असे असताना काही गावात अशाप्रकारे मीटिंग आयोजित करून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याची अनेक उदाहरणं पुढे येत आहेत. या आधी सुद्धा गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन मध्ये चिपळूण तालुक्यातील तनाळी येथे अशीच सभा आयोजित केली गेली होती. त्यानंतर तेथील आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा येथील ग्रामस्थांनी केली होती त्यामुळे आता रावळगाव येथील ही सभा आयोजित करणाऱ्या ग्रामस्थांवर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.