दापोली -एस. टी. कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये येत असल्याने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने दापोली आगारातच टप्याटप्याने लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी दापोली एस. टी. कर्मचा-याच्या वतीने करण्यात येत आहे.
दापोली राष्ट्रीय परिवहन महामंडळ दापोली आगारात सद्यस्थितीत ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी ९७ कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र उर्वरीत १९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. यापूर्वी ५० जणांच्या गटाप्रमाणे लसीकरण केले गेले. परंतु त्या वेळीही अनेक कर्मचाऱ्यांना दिवसभर ताटत्कळत रहावे लागले होते. तर काही जणांची नंबरच लागला नाही. अशी माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली. आता काही मार्गावरील बस फे-या सुरू झाल्याने केंद्रावर जाऊन लस घेणे कर्मचाऱ्यांना शक्य नाही. तसेच दररोज शेकडो प्रवाशांच्या संपर्कात चालक व प्रामुख्याने वाहक येतात. त्यांचा नियंत्रक तसेच प्रशासकीय कार्यालयात सातत्याने संपर्कात येतो. दुर्दैवाने सेवा बजावताना एखादा कर्मचारी पाझिटिव्ह आल्यास त्याचा खूप त्रास त्याच्या कुटुंबियांसहीत इतर कर्मचाऱ्यांनाही भोगावा लागतो.
लस घेतल्यावर लागण झालीच तरी त्रास कमी होतो असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये येत असल्याने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने दापोली आगारातच टप्याटप्याने लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी दापोली एस. टी. कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.