रत्नागिरी – चक्रीवादळ उद्या सकाळी राजापूर, आंबोळगड येथून सकाळी 11 वाजता जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रवास दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णगड , सायंकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरी असा असणार आहे. या वादळाचा राजापूर मध्ये जास्त धोका आहे, वाऱ्याचा गती 50 ते 60 किमी असणार असून सोसाट्याचा वारा 80 ते 90 गतीने जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. मागील वेळेस आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वाऱ्याची गती 120 इतकी होती. यावेळी समुद्र किनाऱ्यावर असणारी विशेष करून राजापूर, आंबोळगड येथील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आले आहे. मच्छिमारी करणाऱ्या सर्व नौका किनाऱ्यावर पोहचल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. पर राज्यातील बोटी देखील किनाऱ्यावर आश्रयाला आल्या आहेत. वादळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, राजापूर, गुहागर, मंडणगड, दापोली, या भागात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.