गुहागर – गुहागर तालुक्यातील कौंढर काळसुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाड टाकून 5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
राज्य उत्पादन विभागाला कौंढरकाळसुर येथे गावठी हातभट्टीचा कारखाना असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार उपअधिक्षक व्हि. व्हि. वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी येथील निवडक अधिकारी कर्मचारी यांचे भरारी पथक करण्यात आले. अत्यंत गुप्तपणे हे पथक कौंढर काळसुर येथे पोचले. तेथे 500 लिटरच्या काळ्या टाक्यांमधुन गावठी दारुसाठी वापरण्यात येणाऱ्या 23 हजार लिटर रसायनाची साठवणूक करण्यात आली होती.या रसायनासह 5 लाख 76 हजार 950 रु. किंमतीचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला आहे. या मोठ्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करावा लागला आहे.