गुहागर – गुहागर तालुक्यातील निगुंडळ ग्रामपंचायत आमच्यात ताब्यात अशी बतावणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करताना भास्कर जाधव यांचे खंदेसमर्थक इम्रान घारेंच्या प्रयत्नांना यश आले.आणि निगुंडळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. प्रभाग १ मधून निवडून आलेल्या दिप्ती गिजे यांची सरपंचपदी आणि सुभाष गावडे यांनी उपसरपंच पदी निवड झाली आहे.
निगुंडळ ग्रामपंचायत कोणाची असे दावे प्रतिदावे सुरु झाले तेव्हा भाजपने निगुंडळ आमचीच असा दावा केला. परंतू हा दावा सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीपर्यंत टिकला नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक इम्रान घारे यांनी भाजपच्या दाव्यांचे खंडन केले नाही. मात्र निगुंडळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकण्याची व्यवस्था केली.
कुठेही खिंडार पडणार नाही अशी भक्कम तटबंदी इम्रान घारेंनी केली. त्यामुळे सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेचा भगवा निगुंडळ ग्रामपंचायतीवर फडकविण्यात इम्रान घारेंना यश आले. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीनंतर इम्रान घारेंनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांना फेटे बांधले. सर्वांचा सन्मान केला. बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार मानले.