खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील एका अवघड वळणार आरामबसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले, गोव्याहून मुंबईकडे जाणारी श्री साईपुजा ट्रॅव्हल्स या कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक एमएच-०४-जीपी-१८११) मध्यरात्री भोस्ते घाट उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दुभाजकावर आदळली आणि अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवाशी सुखरूप असले तरी बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्बाल भोस्ते घाटात तयार करण्यात आलेल्या या अवघड वळणावर वारंवार अपघात होत असल्याने हे वळण प्रवाशी आणि चालकांसाठी अतिशय धोकादायक झाले आहे. गेल्या चार महिन्यात या ठिकाणी किमान सात ते आठ अपघात झाले आहेत. तीव्र उतरावर असलेल्या काटकोनी वळणाचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी वाहनांचे सतत अपघात होत आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अपघातांना आळा घालण्यासाठी की अपघातांमध्ये वाढ होण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
भोस्ते घाटातील या अवघड वळणावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाचा ठेकेदार कंपनीने आवश्यक ती उपाय योजना करणे गरजेचे आहे. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला तशा सुचना करायला हव्यात. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी किंवा ठेकेदार या ठिकाणी होणारे अपघात गांभिर्याने घेत नसल्याने या वळणावर सुरु असणारी अपघातांची मालिका थांबेल असे वाटत नाही.