गुहागर; ‘मोडकाघर’मध्ये साकारतोय ‘भास्कर’ सेतू जलाशयात मातीचा भराव टाकून पर्याय मार्गाचे काम सुरु

0
990
बातम्या शेअर करा

गुहागर- गुहागर-शृंगारतळीला जोडणाऱ्या मोडकाघर जलाशयावरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना 20 कि.मी. वळसा मारुन गुहागरला जावे लागत आहे. ही मोठी गैरसोय लक्षात आमदार भास्कर जाधव यांनी मोडकाघर जलाशयातून मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार हे काम सुरु झाले असून जणूकाही भास्कर सेतूच उभारणी सुरु असल्याचे दिसून येत आहे.
गेले दोन वर्षे मोडकाघर पुलाच्या दुरुस्तीचे कवित्व सुरुच आहे. सुरुवातीला हा पूल मोडकळीस आल्याने वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी यांनी सुमारे 20 कि.मी.चा वळसा मारुन शृंगारतळी, पालपेणे, रानवीमार्गे गुहागरला जावे लागत असे. यामुळे आर्थिक भुर्दंड व बराच वेळ लागत असे. वाहनचालक, प्रवासी त्रस्त झाले होते. अशावेळी आमदार जाधव यांनी आपला बांधकाम क्षेत्रातील अनुभव व कल्पकता वापरुन मोडकाघर पुलाला पर्याय सुचविला होता. जेणेकरुन आहे त्याच पुलावरुन वाहतूक कशी सुरु करता येईल, यामागे ती कल्पना होती. मात्र, याला राजकीय अडसर आल्याने पर्यायी मार्गाचा विषय तसाच अधांतरी राहिला. यानंतर एक वर्षानंतर या पुलाखालून बरेच राजकीय पाणी वाहून गेले. अनेकांना मोडकाघर पुलाला पर्यायी मार्ग शोधता आलेला नाही. मात्र, त्यावेळी भास्कर जाधव यांनी सुचविलेली कल्पना प्रत्यक्षात अमलात आली असती तर या सर्वांचीच गैरसोय दूर झाली असती. मात्र, तसे झाले नाही. पावसाळा सुरु झाल्यानंतर या पुलाचे बांधकाम अर्धवटच राहिले. जलाशयाची पाणी पातळी खालावल्याशिवाय पुलाचे काम करणे शक्यच नव्हते. अशावेळी पुन्हा पूल रखडल्याची ओरड सुरु झाली.
अखेर हा विषय पुन्हा आमदार जाधव यांच्याकडेच गेला. त्यांनी पुलाच्या बांधकामाला लागणारा विलंब लक्षात घेऊन तातडीने ठेकेदार, अधिकाऱी यांना घेऊन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पर्यायी मार्गाची कल्पना देऊन काम करण्याच्या तशा सूचना केल्या. पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याच्या जवळूनच जलाशयात मातीचा भराव टाकून चारचाकी, दोनचाकी वाहने जातील असा तात्पुरता रस्ता बनविण्याचा मोठा निर्णय घेतला. अखेर या कामाला मूर्त स्वरुप आले आहे. काही दिवसांतच हा पर्यायी रस्ता होऊन आजपर्यंत वळसा मारुन जाणाऱ्या वाहनांना या रस्त्यावरुन गुहागरकडे ये-जा करता येणार आहे.
दरम्यान, गुहागर तालुक्यात मोडकाघर पुलाला होणाऱ्या या पर्यायी रस्त्याबद्दल अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकांनी हा भास्कर सेतू असल्याचे गौरवउदगार काढून आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here