गुहागर – आमदार भास्कर जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील जेटीच्या कामाच्या सीआरझेडच्या परवानगीचा मोठा अडसर दूर झाला असून आता या जेटीचे काम दृष्टीक्षेपात आले आहे. जेटीशी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भास्कर जाधव यांनी प्रत्यक्ष साखरीआगर समुद्रकिनारी जावून पाहणी केली.
साखरीआगर हे गाव समुद्रकिनारी असूनदेखील वर्षानुवर्षे येथील मच्छीमारांना जेटी नसल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. जेटी नसल्याने होडया नांगरणे, मासे उतरविणे शक्य होत नाही. परिणामी, रत्नागिरी तालुक्यातील जयगड या बंदरामध्ये त्यांना आपल्या होडया उभ्या करून ठेवाव्या लागतात. परिणामी साखरीआगर ते जयगड हा प्रवास तसेच डिझेल वाहतूक करणे या सर्व बाबी फारच खर्चिक असल्याने त्यांचे फारच नुकसान होते. येथील मच्छीमारांची ही व्यथा समजल्यानंतर आमदार जाधव यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत या ठिकाणी जेटी मंजूर करून घेतली.सन २०१२ मध्ये या जेटीचे काम सुरू झाले. परंतु, काम सुरू झाल्यानंतर सीआरझेडची परवानगी नसल्याचा मुद्दा पुढे आला आणि संबंधित ठेकेदाराने काम अर्धवटस्थितीत सोडले.सदर परवानगी मिळून हे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी जाधव यांचा गेल्या ६-७ वर्षांपासून सातत्याने संघर्ष व पाठपुरावा सुरू होता. दरम्यानच्या काळात कामाचा खर्चही वाढला. या सगळयांसाठी त्यांनी वारंवार संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठकाही घेतल्या. विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून आवाज उठवला. अखेर या कामातील अडसर ठरलेली सीआरझेडची परवानगी मिळाली आणि त्यांच्या अथक सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले.
सीआरझेडची परवानगी मिळाल्यानंतर आता या कामाला गती यावी म्हणून त्यांनी काल महसूल, पतन, मत्स्य, बांधकाम अशा सर्वच विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना साखरीआगर येथे बोलावून घेतले. झालेल्या आणि पुढे करावयाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. अधिकाऱ्यांनीही लवकरात लवकर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना व उपस्थित मच्छीमार ग्रामस्थांना दिले. जेटीच्या कामाला चालना मिळाल्याने आनंदीत झालेल्या ग्रामस्थांनी आमदार जाधव यांच्यासह आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला. ‘आमदार भास्कर जाधव यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. त्यांनीच जेटी मंजूर केली आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आता ती पूर्णत्वास जाणार आहे. आम्हा मच्छिमारांना खूप मोठा फायदा या जेटीमुळे होणार आहे, असे उद्गार यावेळी पावसकर यांनी काढले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, पतन विभागाचे कार्यकारी अभियंता हुन्नरकर, मत्स्य विभागाचे निरीक्षक देसाई यांच्यासह अन्य स्थानिक अधिकारी वर्ग तसेच जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, सौ. नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सदस्य सीताराम ठोंबरे, गावचे माजी सरपंच विठोबा फणसकर, लक्ष्मण पावसकर, हेदवतडचे सरपंच हेदवकर यांच्यासह गावातील मच्छीमार ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.