खेड -खेड तालुक्यातील तिसंगी येथील जंगलात धाड टाकून खेड पोलिसांनी धगधगणाऱ्या गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी तिसंगी खोपकरवाडी येथील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील तिसंगी खोपकरवाडी येथील जंगलमय परिसरात गावठी दारूच्या भट्ट्या धगधगत असल्याची माहिती खेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या बातमीची शहनिशा करून खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, रवींद्र बुरटे, अजय कडू, राहुल कोरे, प्रकाश पवार, रोहित मांगले, अरविंद जमदाडे, राम नागुलवार, शंभाजी मोरपडवार, सचिन जाधव, रुपेश पेडाम्बकर यांच्या सह सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तिसंगी खोपकरवाडी परिसरातील जंगलमय भागात धाड टाकली.
या वेळी त्यांना जंगमय भागात गावठी दारूची भट्टी धगधगत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच हातभट्टी लावणारे तिघेजण जंगलमय भागात पळून गेले. पोलिसांनी धगधगणारी हातभट्टी उध्वस्त करून त्या ठिकाणाहून ३८५ लिटर गावठी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे १०,५०० लिटर रसायन, त्याचप्रमाणे मोठमोठ्या प्लास्टिकच्या टाक्या असा सुमारे ३ लाख तीस हजार, तीनशे पन्नास रुपयांचा महेमल जप्त केला.
पोलिसांच्या या कारवाईत दारूची भट्टी लावणारे अजित भोसले, रोशन भोसले , स्वप्नील भोसले हे सापडले नसले तरी पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गावठी दारू गाळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.