गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे या ग्रामपंचायतीवर एकमुखी प्राबल्य असूनही येथील महिला सरपंचावर राजीनामा देण्याची वेळ आल्याने येथे मोठे राजकीय बदल होण्याची चर्चा रंगत आहे.
दीड वर्षांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रित पॅनेलद्वारे निवडणूक लढवली होती. पालशेत ग्रामपंचायतीच्या एकूण १३ सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे आठ तर शिवसेनेचे चार असे बारा सदस्य निवडून आले. भाजपचे प्राबल्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीवर त्यांचा केवळ एकच सदस्य निवडून आल्याने शिवसेना व राष्ट्रवादीच्या ताब्यात येथील एकहाती सत्ता आली. त्यानंतर सरपंचपदी शिवसेनेच्या स्वरुपा तांबे निवडून आल्या. त्यानंतर उपसरपंच पदासाठी मोठे राजकीय नाट्य रंगले. महेश वेल्हाळ व पंकज बिर्जे अशा राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने येथूनच पुढील काळात अंतर्गत राजकारण तापणार, याचे संकेत मिळाले होते. अखेर उपसरपंच पदासाठी महेश वेल्हाळ यांना पाच, पंकज बिर्जे यांना ५ व तिसर्या उमेदवाराला ३ मते मिळाल्याने सरपंचांचे निर्णायक मत महत्वाचे ठरले. हे मत महेश वेल्हाळ यांच्या पारड्यात गेल्याने उपसरपंचपदी वेल्हाळ निवडून आले. त्यानंतरच्या दीड वर्षात पालशेत गावाच्या अंतर्गत राजकारणातून अनेकवेळा बदल होत राहिले. आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे आधीच शिवसेना-राष्ट्रवादी यांची युती असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये
अधिक राजकीय बळकटी येईल, असे वाटत असतानाच गेल्या दीड वर्षात ग्रामपंचायतीमध्ये एकमेकांना शह काटशाह देण्याचा खेळ रंगत होता. याच राजकारणाला कंटाळून तांबे या सरपंचपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गावात होत होती. अखेर केवळ दीड वर्षांची सरपंचपदाची कारकीर्द झाली असतानाच सरपंच स्वरुपा तांबे यांनी प्रथम पक्षाच्या वरिष्ठांकडे राजीनामा सादर केला व त्यानंतर कायदेशीररित्या गुहागर पंचायत समितीकडे राजीनामा सादर केला त्याला मंजुरीही मिळाली आहे. शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन बाईत यांनी विशेष बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही.