चिपळूण- कोण तो अर्णब..?काय बोलतो…?म्हणे भारताची जित झाली…! अरे कसपट तू…तू ठरवणार भारताची हार आणि जित…तू शिवसेनेला नाही ओळखलंस अजून…आशा शेलक्या शब्दात अर्णब गोस्वामीचा समाचार घेत आमदार भास्कर जाधव यांनी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि भाजपवर देखील टीकेचे बाण सोडले.मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी कोकणाचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.पुढील स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश ही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.कोढये येथील स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.
गुहागर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्यातील ७२ गावातील शिवसैनिकांचा मेळावा तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी कोंढे रिगल हॉल येथे गुरुवारी आयोजित केला होता.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आमदार भास्कर जाधव जिल्हाप्रमुख सचिन कदम उपस्थित होते.तर व्यासपीठावर जी.प सदस्य विक्रांत जाधव,तालुकाप्रमुख संदीप सावंत,जी.प सदस्य ऋतुजा खांडेकर,अरुण चव्हाण,युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते,सभापती धनश्री शिंदे,माजी उपसभापती शरद शिगवण,उपतालुकप्रमुख संभाजी खेडेकर उपस्थित होते.मेळाव्याला प्रचंड उपस्थिती लाभली होती आम.जाधव यावेळी म्हणाले मला आता प्रतिस्पर्धी राहिलेला नाही.कारण मी मतदारसंघ विकास कामावर उभा केला आहे.ज्या-ज्यावेळी मी वेगळा निर्णय घेतला त्यात्यावेळी जनता माझ्या बरोबर राहिली त्याचे कारणच हेच आहे की मी विकास कामानेच लोकांची मने जिंकली आहेत.आणि माझ्या समोर जो उभा राहिला तो परत कधी निवडून आला नाही आणि मतदारसंघात पुन्हा दिसला देखील नाही.भास्कर जाधव ६ वेळा जिंकून आला आहे.असा टोला देखील त्यांनी हाणला. आता मला तरुणांच्या रोजगारावर लक्ष द्यायचे आहे.त्यासाठी गुहागर येथे प्रस्तावित असणारी एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेणार आहे.तसेच खेड एमआयडीसी मध्ये देखील लक्ष घालून तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.जिल्हा नियोजनचा निधी कोरोनासाठी वापरला जात आहे.परंतु मी शासनाच्या माध्यमातून १४ कोटी रुपये मतदारसंघासाठी आणले आहेत.तसेच दिवाळी नंतर मतदारसंघातील सर्व नळपाणी योजना मंजूर करून घेणार असल्याचे ते म्हणाले.
आगामी निवडणुका बाबत बोलताना त्यांनी तालुकाप्रमुख संदीप सावंत आणि शिवसैनिकांना आतापासूनच कामाला लागा असे आदेश दिले.यावेळी सर्व ग्रामपंचायत आणि चिपळूण गुहागर या पंचायत समितीवर एक हाती भगवा फडकणार म्हणजे फडकणारच आणि मी फडकवून दाखवणार .आता थांबू नका.भास्कर जाधव तुमच्या पाठी खंबीर उभा आहे.जिथे जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी भास्कर जाधव उभा ठाकणार आहे.असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये चांगलाच जोश भरला होता.
जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले आघाडी आहे नाही होणार की नाही याची चिंता न करता शिवसेना एके शिवसेना हाच उद्देश ठेवून पुढील ग्रामपंचायती आणि सर्व निवडणुकांसाठी तयारीला लागा.नवा जुना वाद घालत बसू नका.आपल्याला १०० ग्रामपंचयातीवर भगवा फडकवायचा आहे.दिवाळी संपताच तरुणांच्या रोजगारासाठी कामाला लागणार असल्याचे सचिन कदम म्हणाले.तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी देखील यावेळी जोशपूर्ण भाषण केले.आम.जाधव यांच्या सारखे नेतृत्व पाठीशी उभे राहिल्याने आता थांबणार नाही.एक एक कार्यकर्ता जोडून सर्वांना बरोबर घेऊन १०० टक्के यश खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.