बातम्या शेअर करा

गुहागर – देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांचे रोजगार बुडाले.संचारबंदी व जमावबंदी असल्याने अनेकांपुढे जगण्याचे मोठे संकट उभे राहिले.तर काहींना घर बसल्या आता काय करावे असे प्रश्न पडू लागले.मात्र या संकटातही न डगमगता तळवली आगरवाडी येथील दिलीप आग्रे यांनी आपल्या कुटुंबाला सोबत घेत दरवर्षीची पाण्याची वणवण थांबवण्यासाठी विहीर खणण्याचा अनोखा उपक्रम राबवत आपली पाण्याची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.


राज्यात कोरोना व्हायरसने सर्वांनाच मोठा दणका दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला.लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच नागरिकांना घरातच बसावे लागले आहे.अनेक जण मुंबई पुण्यात अडकून पडले आहेत.तर शिमगोत्सवाला गावी आलेले काही जण गावीच अडकून पडले आहेत. मात्र हीच संधी शोधून तिचे सोने करण्याचा विचार तळवली अगरवाडीतील दिलीप आग्रे यांनी केला.आपली दरवर्षीची उन्हाळ्यात होणारी पाण्याची वणवण कमी व्हावी यासाठी या कुटुंबाने घरी बसण्यापेक्षा विहिर खोदण्याचा प्रयत्न केला.आणि “प्रयत्नांती परमेश्वर ” या प्रमाणे दिनांक १४ एप्रिल पासूनच्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात विहीर खोदण्याला सुरुवात करत अवघ्या १५ ते २०दिवसात पाणी शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
दिलीप आग्रे यांचे कुटुंब एकत्र पध्दतीचे आहे.त्यामुळे घरामध्ये जवळपास २० ते २२ माणसे आहेत. आणि या सर्वांच्या एकीच्या व जिद्दीच्या जोरावर या कुटुंबाने हे काम यशस्वीपणे पार पाडून दाखवत सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.या अनोख्या कामासाठी दिलीप आग्रे,श्रीधर आग्रे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे.

आम्ही एकत्र कुटुंबात राहतो.मात्र अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबईतील कुटुंब सदस्य गावीच अडकून पडले.इतके दिवस घरी बसून काय करणार म्हणून एकत्र विचार करू लागलो.यावेळी आम्हाला दरवर्षी उन्हाळ्यात भासणारी पाण्याची चणचण आमच्या नजरेसमोर आली.यामुळे आम्ही घरी बसण्याऐवजी विहीर खोदण्याचा विचार केला . कुटुंबातील सर्व सदस्यांनी देखील यासाठी होकार दिला.यानंतर आम्ही लगेचच विहीर खोदण्यास सुरुवात करत १४ एप्रिलपासून या कामास सुरुवात करत अवघ्या १५ ते २० दिवसात हे काम पूर्ण केले.अवघ्या काहीच अंतरावर पाणी मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्याने आमच्या श्रमाचे चीज झाले आहे.तसेच लॉकडाऊन काळातील वेळही वाया गेली नाही.या पाण्याचा वापर घरगुती व भाजीपाला पिकवण्यासाठी आणि गरजूंना मोफत देण्यासाठी आम्ही करणार असून माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यासाठी मोलाची मेहनत घेतली असल्याचे दिलीप आग्रे यांनी सांगितले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here